सभापतींना ध्वजवंदन करु दिल्याने राज्यपालांवर काँग्रेसचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 09:34 PM2018-12-19T21:34:26+5:302018-12-19T21:34:41+5:30
सभापती प्रमोद सावंत यांनी राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत दुस-यांदा ध्वजवंदन केले. या प्रकारास प्रदेश काँग्रेसने पुन: जोरदार आक्षेप घेत राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पणजी : सभापती प्रमोद सावंत यांनी राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत दुस-यांदा ध्वजवंदन केले. या प्रकारास प्रदेश काँग्रेसने पुन: जोरदार आक्षेप घेत राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपाल आपले घटनात्मक कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करुन त्यांचा निषेधही करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, घटनेने प्रत्येकाला वेगवेगळी भूमिका दिलेली आहे. त्यानुसार सभापतीपदावरील व्यक्ती ही नि:पक्षपाती आणि तटस्थ असायला हवी. सभागृहात सभापतींची न्यायपालिकेची भूमिका असते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभापतींनी दुस-यांदा ध्वजवंदन करुन आपण सरकारच्या बाजुने असल्याचे दाखवून दिले. सरकारच्यावतीने त्यांनी भाषणही केले.
चोडणकर पुढे म्हणाले की, ‘गेल्या आॅगस्ट महिन्यात देशाच्या स्वातंत्र्यदिनी सभापती झेंडावंदन करणार अशी माहिती मिळाल्यावर आम्ही राज्यपालांना पत्र लिहून सावंत यांना याबाबतीत प्रतिबंध करण्याची विनंती केली होती. राज्यपालांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच सभापतींनी पुन: राज्य पातळीवरील कार्यक्रमात ध्वजवंदन केले. या सर्व गोष्टींना आणि जी अंदाधुंदी चालली आहे त्यास राज्यपालच जबाबदार आहेत. त्या कर्तव्य निभावण्यास पुन: अपयशी ठरल्या त्यामुळे राजीनामा देऊन दूर व्हावे नपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांना या पदावरुन हटविण्याची मागणी आम्ही करणारच आहोत.’