पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने भाजपामध्ये नेतेपदाबाबत तात्पुरती तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी, असे भाजपच्या कोअर टीममधील बहुतेक सदस्यांना यापूर्वी वाटले आणि काँग्रेसनेही आपले सरकार स्थापन करता येईल काय याविषयी चाचपणी करून पाहिली तरी, प्रत्यक्षात काही घडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मगो पक्षाला सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने सिग्नल पाठविले तरी, मगोपच्या नेत्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.पत्रकारांनी मगोपचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांना सोमवारी नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी विचारले असता, मंत्री ढवळीकर म्हणाले की, नेतृत्व बदलाचा विचार करण्याच्या मूडमध्ये सध्या कुणीच नाही. आम्हाला पाच वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृत्वाखाली सरकार चालवायचे आहे. प्रशासन ठप्प वगैरे काही झालेले नाही. मी स्वत: आज 20 फाईल्सना प्रशासकीय मंजुरी दिली. मी तसेच विजय सरदेसाई, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो व विश्वजित राणे हे मंत्री कोणत्याही खात्याचा विषय हाताळण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री आठ दिवस गोव्यात नसले म्हणून काम ठप्प होत नाही.मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगो पक्षाच्या समितीला काँग्रेस पक्षाने सिग्नल देणे बंद करावे. काही माजी मंत्री, माजी आमदार वगैरे सध्या फिरत आहेत. सरकार स्थापनेसाठी काही जण मगोपच्या समितीला भेटून सिग्नल पाठवत आहेत. काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड गोंधळ आहे. त्या पक्षाकडे सोळा आमदार आहेत पण विधानसभेत सोळा देखील उपस्थित राहू शकत नाहीत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतून एक आमदार निषेध म्हणून उठून जातो, असेही मी वाचले. गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसचेच घर सध्या सांभाळावे. स्वत:चे घर सोडून त्यांनी दुस-या पक्षाविषयी बोलू नये. जुवारी पुलाविषयी आमच्यावर विश्वास नाही, असे गिरीश चोडणकर म्हणतात मग ते काही जणांमार्फत मगोपच्या समितीला सरकार स्थापनेसाठी सिग्नल तरी का पाठवतात ते कळत नाही. काँग्रेसचे अनेक आमदार आपल्याकडे मतदारसंघातील कामे घेऊन विश्वासाने येतात व आपण त्यांची कामे करत असतो. कधीच कुणाला येऊ नका म्हणत नाही.काँग्रेसचे चार आमदार इच्छुक : लोबोदरम्यान, काँग्रेसचे चार आमदार मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या संपर्कात होते व त्यांची मुख्यमंत्र्यांशी एक बैठकही झालेली आहे, असा दावा उपसभापती तथा भाजपाचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी येथे केला. काँग्रेसचे चार आमदार भाजपामध्ये प्रवेश करू पाहत आहेत. आम्ही उगाच कुणालाही स्वीकारणार नाही पण काँग्रेसमध्ये जे चांगले आमदार आहेत, त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले जाईल. खरेच त्या पक्षातील काही आमदार काँग्रेस पक्षाविषयी खूप नाखूश असतील तर त्यांनी भाजपात यावे. विद्यमान सरकार स्थिर आहे, असेही लोबो म्हणाले.अनावश्यक अफवा : टोनीसांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस हे लोकमतशी बोलताना म्हणाले, की आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो असून, आम्ही काँग्रेसचेच आहोत. त्यामुळे उगाच कुणी तरी आमच्याविषयी अफवा पसरवू नयेत. आमची निष्ठा काँग्रेस पक्षासोबत आहे.
काँग्रेसचा हात मगोपने नाकारला, आम्हाला पर्रीकरच हवे : सुदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 7:55 PM