पणजी : विद्यार्थ्यांना दरमहा पाच लिटर मोफत पेट्रोल, ‘गृह आधार’चे अर्थसाहाय्य ५ हजार रुपये करणे, रेशन दुकानात गहू, तांदूळ, साखर स्वस्त दरात उपलब्ध करून देणे यासारखी मतदारांना सुखावणारी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सोमवारी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.सत्ता मिळाल्यास काँग्रेस पक्षातर्फे खाण भागातील ट्रकधारक कुटुंबांना एका ट्रकची कर्जमाफी, दारिद्य्र रेषेखालील लोकांना मोफत वीज व पाणी, सामान्यांसाठी वीज व पाणी दरात कपात, अशा सुविधा दिल्या जातील. सरकारी नोकरीसाठी किमान दहावी उत्तीर्ण सक्तीचे करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय रद्द करून आठवी उत्तीर्ण झालेल्यांना सरकारी नोकऱ्या खुल्या केल्या जातील. बेरोजगार युवकांना योग्य प्रशिक्षण देऊन नोकरीही दिली जाईल. आॅफ शोर कॅसिनो राज्यातील नद्यांतून कायमचे हटविणे, सत्तरी, धारबांदोडा, फोंडा तालुक्यांच्या समावेशाने तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करणे, १०० वर्षे पूर्ण झालेली धार्मिक स्थळे वारसास्थळे करण्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहेत. प्रत्येक महाविद्यालयाला सुविधा विकासासाठी १ कोटींचा निधी, स्वयंसहाय्य गटांना ५० हजाराची मदत देण्यात येईल. गहू दोन, तांदूळ तीन तर साखर सात रुपये किलोने देणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
काँग्रेसची सुखावणारी आश्वासने
By admin | Published: January 24, 2017 4:01 AM