पणजी : गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सर्वात मोठ्या ठरलेल्या १७ आमदारांच्या कॉँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यास निमंत्रण न देता कमी संख्याबळ असलेल्या भाजपला निमंत्रण दिल्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसच्या सर्व १७ आमदारांनी राजभवनाच्या मार्गावर निदर्शने केली. कॉँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या निदर्शनाच्यावेळी प्रभारी दिग्विजय सिंग, प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत यांच्यासह सर्व १७ आमदार उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर जो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येतो त्याला सत्ता स्थापनेची संधी दिली जाते, हा लोकशाहीचा निकष आहे; परंतु लोकशाहीची सर्व मूल्ये धुडकावून राज्यपालांनी सत्तेवरून खाली पाडण्यात आलेल्या भाजपला सरकार बनविण्यासाठी पाचारण केले, असे कॉँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी सांगितले. वास्तविक त्यांनी सिन्हा यांची सकाळी १०.३० वाजता भेट मागितली होती; परंतु त्यांना दीड वाजता भेटायला बोलावल्याची माहितीही सिंग यांनी दिली. दिगंबर कामत यांनीही राज्यपालांच्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले की, लोकशाही मूल्यांचे पालन करण्यात आलेले नाही. ज्या भाजप सरकारला निवडणुकीत लोकांनी खाली खेचले त्याच भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यास सांगून चुकीचा पायंडा घातला. ज्या पक्षांच्या आमदारांना घेऊन भाजपने संख्याबळ दाखविले त्या पक्षांकडे भाजपने निवडणुकीपूर्वी युती किंवा समझोता केला नव्हता. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेची प्रथम संधी जाऊच शकत नाही. पक्षाचे सर्व आमदार नंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटले. कॉँग्रेसजवळ सर्वाधिक आमदार असल्यामुळे कॉँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसे निवेदनही त्यांनी राज्यपालांना सादर केले. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसची राजभवन मार्गावर निदर्शने
By admin | Published: March 15, 2017 1:30 AM