ऑडिओ क्लिपच्या वादाने गोव्यातील काँग्रेसला बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:23 PM2019-01-04T12:23:23+5:302019-01-04T14:18:38+5:30
विश्वजित राणे हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्यापासून दुखावली गेलेली गोव्यातील काँग्रेस पक्ष संघटना ऑडिओ क्लिपच्या वादामुळे मात्र सुखावली आहे. ऑडिओ क्लिपचा विषय हा भाजपाच्या वर्मावर घाव घालण्यासाठी वापरण्याची संधी गिरीश चोडणकर यांच्या काँग्रेस पक्षाने सोडली नाही.
पणजी : विश्वजित राणे हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्यापासून दुखावली गेलेली गोव्यातील काँग्रेस पक्ष संघटना ऑडिओ क्लिपच्या वादामुळे मात्र सुखावली आहे. ऑडिओ क्लिपचा विषय हा भाजपाच्या वर्मावर घाव घालण्यासाठी वापरण्याची संधी गिरीश चोडणकर यांच्या काँग्रेस पक्षाने सोडली नाही. भाजपाला हा वाद शांत झालेला हवा आहे तर काँग्रेसने वादाची आग धुमसत ठेवण्याची भूमिका घेतल्यासारखी स्थिती आहे.
ऑडिओ क्लिपच्या विषयावरून चोडणकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी भाजपाला थेट आव्हान दिले आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आवाज ज्या मंत्र्याचा असल्याचे सांगितले जाते, त्या मंत्र्याचे समर्थक गोंधळात पडले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यार्पयत ऑडिओ क्लिप पोहचली. त्या क्लीपमधील आवाज आपला नाही असे भाजपाचे मंत्री विश्वजित राणे यांचे म्हणणे आहे पण तो आवाज राणे यांचाच आहे, असा दावा बुयांव यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत केला आहे.
राफालशीनिगडीत बरीच माहिती पर्रीकर यांच्याकडे आहे असे पर्रीकर यांनी नमूद केल्याचे व त्याविषयीची कागदपत्रे आपल्या खोलीत आहेत असेही पर्रीकर यांनी म्हटल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लीपमध्ये आहे. भाजपाने या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली तरी, स्वत: मात्र पोलीस प्रमुखांना भाजपानेही पत्र पाठवले नाही किंवा मंत्री राणे यांनीही पत्र पाठवले नाही. एरव्ही सर्व विषयांवर पोलीस प्रमुखांना वगैरे निवेदने देण्यात भाजप संघटना आघाडीवर असते पण ऑडिओ क्लीपच्या विषयावर भाजपा सध्या मुका मार सहन करत आहे, अशी चर्चा मंत्रिमंडळातही सुरू आहे.
विश्वजित हे 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर जिंकून आले होते. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. त्यावेळपासून काँग्रेस पक्ष योग्य संधीच्या प्रतिक्षेत होता. ऑडिओ क्लीप काँग्रेसच्या हाती लागल्यानंतर व त्यात पर्रीकर यांचाही उल्लेख आल्यानंतर काँग्रेसने सीबीआयसह अन्य सर्व मोठ्या यंत्रणांनी क्लीपची व पर्रीकर यांचीही चौकशी करावी, अशी मागणी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर, प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी तर चौकशी होत नाही तोर्पयत स्वस्थ बसायचे नाही असे जणू ठरवूनच टाकले आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्ड व मगोपचे सगळे नेते सध्या या वादाकडे तटस्थतेच्या भूमिकेतून पाहत आहेत पण तेही स्वत:चे मनोरंजन करून घेत आहेत.