इंडियन पॅनोरामात गोव्याचा चित्रपट डावलल्यास इफ्फीत निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 04:43 PM2019-10-08T16:43:21+5:302019-10-08T16:57:26+5:30

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात स्थिरस्थावर होऊन यंदा 15 वर्षे होत असून या पंधरा वर्षात गोव्यातील चित्रपटांशिवाय या महोत्सवाचे सादरीकरण झाले नव्हते.

Congrss Takes Objection For Not Including Gaon Film In IFFI Panorama | इंडियन पॅनोरामात गोव्याचा चित्रपट डावलल्यास इफ्फीत निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा

इंडियन पॅनोरामात गोव्याचा चित्रपट डावलल्यास इफ्फीत निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा

Next

मडगाव: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात स्थिरस्थावर होऊन यंदा 15 वर्षे होत असून या पंधरा वर्षात गोव्यातील चित्रपटांशिवाय या महोत्सवाचे सादरीकरण झाले नव्हते. मात्र यंदा प्रथमच इंडियन पॅनोरामा या विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाला स्थान नसल्याने गोव्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गोव्याच्या चित्रपटावर अन्याय झाला तर आम्ही इफ्फीच्यावेळी निदर्शने करु असा इशारा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने दिला आहे. तर इंडियन पॅनोरामातील चित्रपट निवडीमध्ये गोवा सरकारची कसलीही भूमिका नसते असा खुलासा सत्ताधारी भाजपने केला असून पुढचे काही दिवस हा वाद रंगणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इंडियन पॅनोरामा’ या विभागात एकही गोमंतकीय चित्रपटाचा समावेश न केल्याबद्दल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनीही संताप व्यक्त केला आहे. गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांवर झालेला हा अन्याय दूर झाला नाही तर इफ्फीच्यावेळी गोमंतकीय सिने निर्मात्यांसोबत निदर्शने करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही असा इशारा कामत यांनी दिला आहे.

दिगंबर कामत यांनी ट्वीट करुन आपला असंतोष व्यक्त केला आहे. 2012 नंतर इफ्फीच्या आयोजनात गोवा सरकार पूर्णपणो अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांवर जो अन्याय झाला आहे त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून गोमंतकीय चित्रपटांचा समावेश इफ्फीच्या अधिकृत विभागात करावा अशी मागणी केली आहे.

आतार्पयत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या गोव्यातील सर्व चित्रपटांना इफ्फीत स्थान मिळाले होते त्याकडे लक्ष वेधून दिनेश भोसले यांच्या ‘आमोरी’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्याला इंडियन पॅनोरामा विभागात स्थान मिळायला हवे होते असे नमूद करुन राजेश पेडणोकर यांचा ‘काजरो’ हा चित्रपट मामी चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता. दिलीप बोरकर व शामराव यादव यांचा ‘बडे अब्बू’ हा चित्रपट झारखंड राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या सर्व चित्रपटांना इफ्फीच्या अधिकृत विभागात स्थान देणो ही सरकारची जबाबदारी असे ते म्हणाले.

आपण मुख्यमंत्री तसेच गोवा मनोरंजन संस्थेचा अध्यक्ष असताना आमच्याकडे पाच अधिकृत विभागांची जबाबदारी व अधिकार होते. गोमंतकीय सिने निर्मात्यांचे अधिकाधिक चित्रपट इफ्फीत प्रदर्शित करण्यावर त्यावेळी आम्ही भर दिला होता. काँग्रेस सरकारच्या तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ‘गोवा ऑन सेल्युलॉईड’ हा खास अधिकृत विभाग तयार करुन त्याची जबाबदारी मनोरंजन सोसायटीकडे दिली होती याची आठवण कामत यांनी करुन दिली आहे. त्या तुलनेत 2012 नंतर सत्तेवर आलेल्या सरकारकडून काहीच झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

डीएफएफच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक-

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीय चित्रपटांना इफ्फीतून डावलल्याच्या पाश्र्र्वभूमीवर तीव्र नापसंती व्यक्त करताना गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी इफ्फीच्या पॅनोरामात जे चित्रपट निवडले जातात त्या निवडीची गोवा मनोरंजन सोसायटीचा कुठलाही वाटा नसतो असे स्पष्ट करीत फिल्म फेस्टीव्हल दिल्ली संचालनालयाकडून निवडले गेलेले ज्यूरींचे पथक या चित्रपटांची निवड करत असते असे त्यांनी म्हटले आहे.

यंदाच्या पॅनोरामात ‘आमोरी’ हा कोंकणी चित्रपट येणार अशी आम्हाला आशा होती. मात्र त्या चित्रपटाची निवड झाली आहे की नाही याची आपल्याला कल्पना नाही. आज बुधवारी आम्ही दिल्लीत डीएफएफच्या अधिका:यांना भेटणार आहोत. शक्य झाल्यास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेणार आहोत. या भेटीनंतरच गुरुवारी चित्र स्पष्ट होणार असे ते म्हणाले. इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांना स्थान मिळावे यासाठी गोमंतकीय चित्रपटांचा खास विभाग स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Congrss Takes Objection For Not Including Gaon Film In IFFI Panorama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.