पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे. सोमवारीच मंदावलेल्या ओखी वादळाने नंतर काही नुकसानी केली नाही, परंतु बदलेल्या हवामानामुळे राज्यात मंगळवारी जोरदार पाऊस पडला. पावसाला वा-याची साथ नव्हती, मात्र पाऊस राज्यात सर्वत्र पडला. अजूनही गोव्यावर पावसाच्या ढगांची दाटी झाल्याचे हवामान खात्याच्या रडारद्वारे मिळालेल्या छायाचित्रतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे बुधवारीही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीत काणकोण किनारपट्टी भागात आणि तिसवाडीत ढगांची दाटी दिसून येते.सोमवारी ताशी 120 ते 130 किलोमीटर गतीने धावणा-या चक्रीवादळाची गती मंगळवारी साडेपाच वाजता ताशी 55 ते 75 किलोमीटर एवढा उतरल्यामुळे हवामान खात्याने चक्रीवादळाचे रुपांतर खोल कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याचे जाहीर केले. बुधवारी पहाटेपर्यंत तो केवळ कमी दाबाचा पट्टा राहणार आहे आणि संध्याकाळी स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यांत रुपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 8:18 PM