भंडारी समाजाची मते लक्षात घेऊन गोव्यातील मंत्रीमंडळात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:13 PM2018-09-25T16:13:54+5:302018-09-25T16:15:35+5:30
वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भंडारी समाज भाजपकडे आणखीन जास्त जवळ यावा म्हणून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिल्याचे स्पष्ट होते.
नाईक सलग तीन वेळा (२००७, २०१२ व २०१७) विजयी झाले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ते मंत्री होते. आता ते पुन्हा मंत्री झालेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट आहे. ते भंडारी या बहुजन समाजाचे नेते आहेत. याचाही विचार मंत्रिपद देण्यामागे आहेच. त्यांनी वीजमंत्री व इतर काही मंत्रिपदे सांभाळलेली आहेत.
आमदार बनण्यापूर्वी ते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवकही होते. २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपला दुसऱ्या पक्षांचा पाठींबा घेऊन युतीचे सरकार घडवावे लागले. परिणामी नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.
खरे तर राज्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यांचे फक्त १३ उमेदवार विजयी झाले. अशा स्थितीत सरकार स्थापन करण्यात मुरगाव तालुका भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. तालुक्यातील चारही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे नाईक यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यात होता. मात्र काँग्रेस पक्ष सोडून भाजपात आलेले दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांची वर्णी लागली. परिणामी नाईक यांचे कार्यकर्ते खूप नाराज झालेले. नाईक यांनी मात्र पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते.
आता मुरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांची मते भाजपच्या बाजूने आणण्यासाठी मंत्री नाईक, मंत्री गुदिन्हो प्रयत्न करतील. दुसरे असे की मुरगाव तालुक्यातील वास्को, कुठ्ठाळी, दाबोळी व मुरगाव अशा चारही मतदारसंघातील भंडारी बहुजन समाजाची मते राखण्यात नाईक महत्त्वाचा वाटा राहू शकतो. या कारणांसाठीच मंत्रीपदाची खुर्ची देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटते. मंत्रीमंडळातील बदल पाहता भाजपने दक्षिण गोव्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.