लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: येथील रवींद्र भवनाला 'लता मंगेशकर कलांगण', तर माजी मंत्री व कलाकार स्व. संजय बांदेकर यांचे नाव मुख्य सभागृहाला देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ही घोषणा करतानाच स्व. बांदेकर यांचे तैलचित्रही सभागृहात लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, रवींद्र भवनचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, काणकोणच्या नगराध्यक्षा सारा शंभा देसाई, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, सहायक संचालक मिलिंद माटे, गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्या संचालिका अनिता कवळेकर, व्यवस्थापकीय संचालक हरीश हडकोणकर, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष सर्वानंद भगत, जैवविविधता मंडळाचे सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम उपस्थित होते.
२०१३ साली रवींद्र भवनाची पायाभरणी केली होती. तब्बल १२ वर्षांनी म्हणजे एका तपाने या भवनाचे उद्घाटन करण्यात आले. रवींद्र भवनाला लता मंगेशकर कलांगण व मुख्य सभागृहाला संजय बांदेकर यांचे नाव दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत केले.
रवींद्र भवनचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण केली. त्यानंतर फीत कापून रवींद्र भवनचे उद्घाटन केले व नामफलकाचे अनावरण केले. यावेळी त्यांनी राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन केले. तसेच वाचनालयाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री म्हणाले, साधन सुविधा निर्माण झाल्या म्हणून होत नाही. त्या साधनांचा सदुपयोग व्हायला हवा. कला संस्कृतीचे जतन करण्यासाठी रवींद्र भवनाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.