बांधकाम भरती घोटाळा; लोकायुक्तांकडे तक्रार करू: माणिकम टागोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:23 AM2023-12-02T11:23:50+5:302023-12-02T11:24:41+5:30
सरकारच्या कारभारावर साधला निशाणा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बांधकाम खात्यातील भरती घोटाळा प्रकरणी काँग्रेस लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी टागोर यांना काँग्रेसच्या एकाही आमदाराने या भरती घोटाळा प्रकरणात आवाज उठवलेला नाही, याकडे लक्ष वेधले असता टागोर यांनी वरील विधान केले.
बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व टेक्निकल असिस्टंट पदांवरील भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले, असे असतानाही काँग्रेसचा एकही आमदार काहीच बोलत नाही हे पत्रकारांनी टागोर यांच्या निदर्शनास आणले. त्यावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या प्रकरणी काँग्रेसने दक्षता खात्याकडे तक्रार केलेली आहे. परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सांगितले.
पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात मंत्र्याने या पदांच्या भरतीत घोटाळा केला होता. ३६० पदे गृहीत धरली तरी सरकारने ३६,००० उमेदवारांवर अन्याय केला आहे. दक्षता खाते तक्रारीला दाद देत नाही. त्यामुळे आम्हाला आता लोकायुक्तांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर हेही उपस्थित होते.
६०० कोटी आले अन् गेले
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, नीलेश काब्राल यांचे मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पत्र बारकाईने वाचल्यास काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपने फुटिरांना मंत्रिपदाच्या ऑफर दिल्या होत्या हे सिद्ध होते. तसेच दोन वर्षापूर्वी केंद्राकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी ६०० कोटी रुपये आले होते. परंतु पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. अखेरच्या क्षणी हंगामी शेड उभारल्या. गोव्याच्या खेळाडूंवर अन्याय केला.
पाच महिने कोण पेपर तपासत होते?
पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, कर्मचारी निवड आयोग अजून कार्यान्वित होऊ शकलेला नाही. बांधकाम खात्यातील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल ४८ तासांत जाहीर व्हायला हवा. पाच महिने का लागले? कोण पेपर तपासत होता, असा प्रश्न उपस्थित करत निकालास लावलेल्या विलंबामुळे संशय निर्माण झाल्याचे ते म्हणाले.