पणजी : शहरापासून जवळच मेरशी येथे जिल्हा सत्र न्यायालयासाठी सुरू असलेले इमारतीचे बांधकाम ३१ मार्च २0२१ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे १२0 कोटी रुपये खर्च करुन साधन सुविधा विकास महामंडळ हे बांधकाम करीत आहे. १ एप्रिल २0२१ पासून जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु होईल. या कामाला विलंब लागला त्यामुळे हायकोर्टाने या कामावर आता निगराणी ठेवली आहे.
आॅक्टोबर २0१६ मध्ये काम सुरू झाले परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत १९ टक्केही काम पूर्ण झालेले नाही. निधीची कमतरता होती परंतु या कामवर हायकोर्टाने निगराणी ठेवल्यापासून आता नियमितपणे निधी मिळू लागला आहे. पाच मजली इमारतीत सर्व सत्र न्यायालये तसेच कनिष्ठ न्यायालये असतील. सध्या राजधानी शहरात जुन्या पोर्तुगीजकालीन इमारतीत ही न्यायालये चालतात. ही इमारत मोडकळीस आलेली आहे. या जुन्या इमारतीमध्ये जागाही अपुरी पडते. उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्यामुळे काम करणे असह्य होते. याचिकादार किंवा प्रतिवादी सोडाच अनेकदा वकिलांनाही बसायला जागा मिळत नाही त्यामुळे उभे रहावे लागते. कनिष्ठ न्यायालये तसेच सत्र न्यायालयांमध्ये दाखल होणाºया खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यापूर्वीही सत्र न्यायालय भाड्याच्या जागेत हलविण्याचे प्रयत्न झाले होते परंतु वकिलांनी त्यास विरोध केला. भाड्यापोटी सरकार उधळपट्टी करायला निघाले आहे, असा आरोपही झाला.