लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात २४ तासांत जवळजवळ अडीच इंच पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मान्सूनची तूट भरून निघाली आहे. हंगामी पाऊस १३ इंचावर पोहोचला आहे. दरम्यान, आज सोमवारीही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
शनिवारी सकाळी ८:३० ते २५ जून रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत नोंद झालेला अडीच इंच पाऊस या हंगामातील चोवीस तासांत पडलेला सर्वाधिक पाऊस ठरला आहे. १८ जूनपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला दोन इंच पाऊस हा त्यानंतरचा उच्चांक आहे. तर २४ जूनच्या सकाळपर्यंत पडलेला एका दिवसातील १.८५ इंच पाऊस तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याचे फोटोही लोक सोशल मीडियावर टाकत आहेत.
शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेही जोरदार पाऊस पडला. सकाळी ८:३० नंतर राज्यात सरासरी अर्धा इंच पाऊस पडला. मडगावात ६ मिली मीटर, पणजी अर्धा इंच तर जुने गोवेत अर्धा इंचाहून अधिक पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या स्वयंचलित यंत्रणेने दिली आहे.
वादळी वाऱ्यामुळे पडझड हरमल जोरदार पावसाला वादळी वाऱ्याची साथ मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचेही वृत्त आहे. भटवाडी-कोरगाव येथील प्रल्हाद गणफुले यांच्या बागायतीतील गुरांच्या गोठ्यावर वडाचे झाड पडून दोन-अडीच लाखांचे नुकसान झाले. संध्याकाळी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी गोठ्यातील गाई, गुरे चरण्यासाठी रानात गेली होती. त्यामुळे प्राणहानी झाली नाही.
ऑरेंज अलर्ट कायम
पावसाचे ढग अजून आकाशात दाटलेले असल्यामुळे सोमवारपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेला ऑरेंज अलर्ट पणजी वेधशाळेने कायम ठेवला आहे.
२८ पर्यंत जोरदार
दरम्यान, मान्सूनची तूट भरून निघताना दिसत आहे. यापूर्वी ७२ टक्क्यांवर पोहोचलेली तूट आता ५७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. २८ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे तूट आणखी भरून निघण्याची शक्यता आहे.
डिचोलीत घरावर वृक्ष पडून नुकसान
डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी पडझड झाली. मुस्लीमवाडा येथील शेख याकूब कमाल यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने वीस हजारांचे नुकसान झाले. त्यांना अग्निशामक दल, वीज खाते, नगरसेवक रियाज खान व स्थानिकांनीही मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आमोणा, सोनशी, कुडणे, कारापूर आदी ठिकाणी रस्त्यावर पडलेले वृक्ष हटवले.
म्हापशात भिंत कोसळून ५ लाखांची हानी
एकतानगर म्हापसा येथे दोन गाड्या व एका दुचाकीवर संरक्षक भिंत कोसळण्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला. सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ब्रागांझा इमारतीची संरक्षक भित रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर पडली. यात दुचाकी वाहनांचा चुराडा झाला. दरम्यान, डांगी कॉलनीतही संरक्षक भिंत कोसळण्याचा प्रकार घडला. गेल्या दोन दिवसात असे तीन प्रकार म्हापशात घडले.
काणकोणात ५ इंच
सध्या तरी दक्षिण गोव्यातच पावसाने अधिक जोर पकडला आहे. रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासात काणकोणमध्ये तब्बल ५ इंच पाऊस पडला. त्यानंतर सांगेचा क्रमांक लागत असून त्या भागात ४ इंच पाऊस पडला. हंगामी पावसाची नोंदही दक्षिण गोव्यातच सर्वाधिक झाली आहे. मडगावात रविवारपर्यंत १८ इंच पावसाची नोंद झाली आहे.