लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : संगीतक्षेत्रात नाविन्य व स्टार्ट-अप येण्याची गरज आहे, यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भर दिला. आल्तिनो पणजी येथील संगीत महाविद्यालयाच्या वार्षिकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अनेक रोगांवर उपचार करण्यात संगीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यात नावीन्यता आणावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे जेणेकरून विविध दीर्घकालीन आजारांमध्ये संगीत उपचार सुरू करता येतील.
तबलावादक पं. उल्हास वेलिंगकर म्हणाले, मानवी आयुष्य समृद्ध करण्याची ताकद संगीतामध्ये आहे. यावेळी उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, शिक्षक, कर्मचारीवर्ग यावेळी उपस्थित होते. गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक मक्तेदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या सहायक प्राचार्य प्राजक्ता वेंगुर्लेकर यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल सादर केला. अलिशा सिमेपुरुषकर हिला २०२२-२३ चा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देण्यात आला. गोवा संगीत महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक सोनिक वेलिंगकर यांनी आभार मानले. गुरुदास गावकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुढील वर्षात संगीत महाविद्यालयाला मिळणार हक्काची इमारत
नाविन्यपूर्ण संगीताद्वारे जे वेदना कमी करण्यात मदत करतील. नवीन शिक्षण धोरण २०२० ने संगीत क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे, असे ते म्हणाले. पुढील आर्थिक वर्षात संगीत महाविद्यालयाला लवकरच नवी इमारत मिळेल अशी घोषणा त्यांनी केली आणि तोपर्यंत अशा कार्यक्रमांसाठी ते इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे व गोवा मनोरंजन सोसायटीचे सभागृह वापरु शकतात, असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"