मडगाव: लॉकडाऊनमुळे गोव्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी काही बाबतीत फायदाही झाला आहे. लॉकडाऊन निर्बंधामुळे गोव्यातील अपघातांचे प्रमाण तब्बल 32 टक्क्यांनी कमी झाले असून अपघाती मृत्यूंचे प्रमाणही 26 टक्क्यांनी खाली आले आहे.
यंदाच्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण 1387 रस्ता अपघात घडले असून त्यात 131 जणांना मृत्यू आला. मागच्या 2019 वर्षात पहिल्या सात महिन्यात हेच प्रमाण 2027 अपघातात 177 बळी असे होते. तुलनात्मक आकडेवारी पाहिल्यास अपघाताचे प्रमाण 32.02 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 25.99 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल व मे महिन्यात राज्यातील वाहतूक जवळपास बंद होती त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदा 131 जणांना मृत्यू आला आहे त्यात 81 दुचाकीस्वार, 10 पाठीमागे बसलेले, 22 पादचारी, 4 प्रवासी, 9 इतर वाहन चालक, 1 सायकलस्वार तर 4 इतरांचा समावेश आहे. 2019 साली 105 दुचाकीस्वार, 21 मागे बसणारे, 25 पादचारी, 18 प्रवासी, तीन वाहन चालक, 2 सायकलस्वार तर अन्य तिघांचा समावेश होता.