समन्वय समिती स्थापन करून उमेदवार ठरवणार: माणिकराव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 02:04 PM2024-03-07T14:04:27+5:302024-03-07T14:04:53+5:30
विरोधकांनी बांधली मोट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी 'इंडिया' युतीच्या बॅनरखाली पाच विरोधी पक्ष एकवटले आहेत. दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवार देणार असून इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांचा या उमेदवारांना पाठिंबा असेल. उमेदवार लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
भाजप उमेदवारांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) हे पाच पक्ष एकत्र आले आहेत. लवकरच या सर्व विरोधी पक्षांची समन्वय समिती स्थापन केली जाईल व लोकसभा निवडणुकीसाठी पुढे कसे जाते हे ठरवले जाईल. आघाडीतील सर्व पक्षांच्या विचारानेच उमेदवार दिले जातील. दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीकडे उमेदवारांची नावे पाठवली जातील व तेथूनच उमेदवार जाहीर केले जातील.
ठाकरे म्हणाले की, गोव्यात भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे घाबरलेला आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजप उमेदवार देऊ शकलेला नाही. उत्तर गोव्याच्या उमेदवाराबाबत जनतेमध्ये काय मत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.
गोवा भेटीवर आलेले काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी 'इंडिया' युतीसाठी बैठक घेतली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर, आमदार वेंझी व्हिएगश, आमदार कुझ सिल्वा, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, अविनाश भोसले, शिवसेना (उबाठा) चे गोवा प्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत आदी बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा तिकीट दिल्यास गोवा फॉरवर्ड पाठिंबा देणार नाही असे या पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आधीच स्पष्ट केले आहे. गिरीश चोडणकर यांच्याशीही विजय यांचे तसे चांगले सबंध नाहीत. त्यामुळे इंडिया अलायन्स जरी झाली तरी काँग्रेस कोण उमेदवार देणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने दक्षिणेत महिला उमेदवार देण्याचे जाहीर केल्यानंतर समीकरणे बदलली आहेत त्यामुळे इंडिया अलायन्ससाठी महिला उमेदवाराचाही विचार केला जाऊ शकतो.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजप घाबरलेला आहे. आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी उमेदवारी नाकारण्यामागचे हेच कारण आहे. उत्तर गोव्यात भाजप उमेदवाराबद्दल काय मत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, भाजपला नारीशक्तीचा एवढा ध्यास आहे तर त्यानी तीन महिला आमदार आहेत त्यापैकी एकीला तरी मंत्रिपद द्यावे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून दक्षिणेत महिला उमेदवाराचे घोडे दामटून दिशाभूल केली जात आहे.
आरजी भाजपची बी टीम ठाकरे
आरजीने आधीच आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. बैठकीचे निमंत्रण असूनही कोणी आले नाही. याबद्दल ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी आरजी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. काँग्रेसची पारंपरिक मते फोडण्यासाठीच आरजी निवडणूक लढवत आहे. सुरवातीला हा पक्ष इंडिया आघाडीसोबत आपण आहे, असे सांगत होता. परंतु काँग्रेसकडे संपर्क न साधताच अचानक आपले उमेदवार जाहीर केले. देशभरात भाजपच्या अशा बी टीम आहेत.
तिकीटासाठी कवठणकर यांचेही नाव
इंडिया आघाडीचे उत्तर गोव्यात उमेदवार म्हणून काही सदस्यांनी सुनील कवठणकर यांचे नाव पुढे केले आहे, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. कवठणकर हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काँग्रेससोबत असलेल्या अन्य विरोधी पक्षांचा कवठणकर यांच्या नावाला विरोध नाही. कवठणकर हे भंडारी समाजातील असल्याने त्यांना तिकीट देण्याचा विचार पुढे आणला गेला. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कवठणकर यांचे नाव मान्य करतील काय हे मात्र स्पष्ट नाही.
भाजपविरोधात उमेदवारी स्वीकारेन: प्रतिमा कुतिन्हो
दक्षिण गोव्यात भाजपकडून महिला उमेदवार दिला जाणार असल्याने काँग्रेस, आप व इतर विरोधी पक्षांच्या इंडिया युतीनेही महिला उमेदवार द्यावा अशी चर्चा सुरु आहे. प्रतिमा कुतिन्हो यांच्या नावाची चर्चा असल्याने 'लोकमत'ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन करुन भाजप महिला उमेदवाराविरोधात तुम्ही रिंगणात उतरा, असा आग्रह धरला. गोव्यात इंडिया अलायन्स होत असेल तर भाजपविरोधात लढण्याची माझी तयारी आहे. इंडिया अलायन्समधील प्रमुख पक्ष काँग्रेस तसेच आपने माझे काम पाहिलेले आहे.
भाजपला अनुकूल असे निर्णय घेतले जाताहेत
काही काँग्रेस नेते भाजपला अनुकूल असे निर्णय घेत असल्याचा आरोप करुन एल्वीस गोम्स यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे. मी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होतो. परंतु काहींनी उमेदवार छाननी समितीकडे माझे नाव पाठवलेच नाही. या सर्व गोष्टी विसरुन काँग्रेसचा विजयी व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, पक्षातील काही नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ज्यांनी काँग्रेस सोडली व भाजपात गेले त्यांच्यासाठी अनुकूल असे निर्णय घेतले जात आहेत.
सार्दिनना विरोध; मला कल्पना नाही
गोवा फॉरवर्डने दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी दिल्यास आपला पाठिंबा नसेल असे जे जाहीर केले आहे, त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले की, सरदेसाई यांनी माझ्याकडे तरी तसे अजून बोलून दाखवलेले नाही. दक्षिण गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महिला उमेदवार देणार का? यावर ठाकरे म्हणाले की, काँग्रेस मित्रपक्षांशी सल्लामसलत करुन उमेदवार देणार आहे. समन्वय समिती यासाठीच आहे.