गोवा सरकारचा 'स्वयंपूर्ण' सर्व्हेक्षण अहवाल हा कॉपी पेस्ट! काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 09:16 PM2020-08-16T21:16:40+5:302020-08-16T21:16:48+5:30
खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे.
पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेली सात सूत्री योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. गोवा व्हिजन डॉक्युमेंट २0३५ ची नक्कल करुन 'स्वयंपूर्ण' सर्वे रिपोर्ट बनविण्यात आला, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसने केली आहे.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात की, ''खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे. या अहवालातील सर्व सातही प्रमुख मुद्दे हे राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गठीत केलेल्या नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोल्डन ज्युबिली मंडळाने सूचविले होते. कामत यांनी विविध क्षेत्रातील १७ तज्ञांच्या समितीकडून तयार करुन घेतलेल्या अहवालाचे श्रेय सावंत सरकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. सावंत यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी.
व्हिजन-२०३५ अहवालात सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा व स्वानंदी गोवा या प्रमुख मुद्यांवर भर देऊन सन २०३५ पर्यंत गोवा आतंराष्ट्रीय स्तरावर आदर्श राज्य म्हणून नावारुपास आणण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता. याच मुद्यांचा सावंत यांनी शनिवारी उल्लेख करुन गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
ते म्हणतात की, ह्यदेर आयी दुरूस्त आयी' या म्हणी प्रमाणे, कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतो व खरोखरच कॉंग्रेस सरकारने दूरदृष्टी ठेवून तयार केलेला हा अहवाल लवकरात लवकर हे सरकार अंमलात आणणार, अशी आशा बाळगतो, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
पर्रीकरांनी आकसापोटी अहवाल शीतपेटीत ठेवला : आरोप
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केवळ व्यक्तिगत आकसापोटी विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, प्रा. माधव गाडगीळ, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, डॉ. पी.एस. रामाणी, स्व. आर्किटेक्ट चार्लस कुरैया अशा १७ मान्यवरांच्या समितीने तयार केलेला अत्यंत महत्वाचा हा अहवाल तब्बल सहा वर्षे कपाटात बंद करुन ठेवल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.
श्रेय काँग्रेसचे : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही सरकारवर टीकेचे झोड उठविताना असे म्हटले आहे की, ह्यमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी सातपदरी योजनेची जी घोषणा केली ती काँग्रेस सरकार सत्तेवर असताना स्थापन केलेल्या गोल्डन ज्युबिली मंडळाने सुचविली होती. २0१0 साली ज्येष्ठ शास्रज्ञ रधुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्त्वाखालील या मंडळाने गोवा-२0३५ व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृध्द, सुशासित आणि स्वानंदी गोवा संकल्पना मांडली होती. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या प्रयत्नाने हे घडले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी हीच संकल्पना उचलली आहे.