गोवा-
मुंबई ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणात चर्चेचं केंद्रस्थान बनलेली कॉर्डिलिया क्रूझ कंपनी (Cordelia Crusie) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोव्यात कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या एका क्रूझवरील तब्बल ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोवा प्रशासन आता चिंतेत पडलं आहे. क्रूझवरील एकूण २ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे क्रूझवरील प्रवाशांना खाली उतरवायचं की नाही याचा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना क्रूझमधून खाली उतरवायचं की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यात आज ४ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचीही माहिती राणे यांनी यावेळी दिली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे सर्व राज्य सतर्क झाले आहेत. त्यात पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या गोवा सरकारनंही राज्यात निर्बंध लागू केले आहेत. पर्यटनाचं आकर्षण असल्यानं गोव्यात कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालं आहे.