पणजी : गोव्यात कोरोनाचे बाधित वाढत असले तरी त्या नियंत्रणात असल्यामुळे गोव्यातील पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यातील पर्यटन उद्योजकांनी आणि संबंधित व्यावसायिकांनी घाबरायचे कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीपाद नाईक म्हणाले की, देशाने यापूर्वी या आजाराशी लढा दिला आहे. गोव्याने खूप बिकट परिस्थितीतही या आजाराशी सामाना केला आहे. कोरोना प्रकरणे हाताळण्यास गोव्यातील आरोग्य यंत्रणे सक्षम आहेत, असे ते म्हणाले. दक्षिण गोव्यातील 'पांचजन्य' साप्ताहिकाने आयोजित केलेल्या 'सागर मंथन 2.0' कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाची प्रकरणे वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची भीती अनाठाई असल्याचेही श्रीपाद नाईक म्हणाले. तसेच, पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात ६५६ जणांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यामुळे सक्रिय बाधीत ३७४२ वर पोहोचले आहेत. गोव्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटनावर त्याचा परिणाम होण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री बोलत होते.