मडगाव: सुमारे 3500 हजार भारतीय खलाशाना घेऊन येत असलेली तीन जहाजे गोव्याच्या वाटेला लागली असून त्यात सुमारे 1200 गोवेकरांचा समावेश आहे. 10 मे च्या सुमारास ती भारतात पोहोचणार असून मुरगाव व मुबंई बंदरावर खलाशाना उतरविण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे.
या तीनपैकी रॉयल कॅरीबियन्स ओवेशन आणि कार्निवल यूरोपा 2 या दोन जहाजानी मुरगाव बंदरावर गोव्यातील खलाशाना उतरविण्यासाठी एनआरआय कार्यालयाशी संपर्क साधला आहे. कोची आणि मुंबई बंदरावरही ही जहाजे भारतीय खलाशाना खाली उतरविणार आहेत.
नॉर्वेचे सेवन सिज वोयाजर हे तिसरे जहाज या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात पोहोचणार असून ते 160 भारतीय खलाशाना मुंबईत उतरविणार आहे. हे जहाज अबू धाबीवरून सुटले असून 10 मे पर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. या जहाजावरील गोवेकर खलाशाना मारेला जहाजावरील खलाशाना ज्याप्रमाणे गोव्यात आणले त्याच प्रमाणे नंतर बस मार्गे गोव्यात आणले जाईल असे एनआरआय कार्यालयाचे संचालक अँथनी डिसोझा यांनी सांगितले.
ओवशन ऑफ द सिज हे जहाज पूर्व आशियातून येत असून 17 मे रोजी ते भारतात पोहोचणार आहे. ते 1000 खलाशाना कोची, 400 खलाशाना मुरगावात तर 500 खलाशाना मुंबईत उतरविणार आहे. युरोपा 2 हे जहाज मुंबईत 500, मुरगावात 800 तर कोचीत सुमारे 200 खलाशाना उतरविणार आहे.