- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात रस्तामार्गे, रेल्वेद्वारे किंवा विमानाने येणा-या प्रत्येक व्यक्तीची कोरोना (कोव्हिड-19) चाचणी केली जाईल असे सरकारने जाहीर केले तरी, प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे हे आव्हानदायी असल्याचे आरोग्य यंत्रणेशी निगडीत विविध घटकही मान्य करतात. गोव्यात एकूण चौदा हजार कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
रस्ता मार्गे राज्यात रोज सरासरी चारशे लोक गोव्यात येतात. त्या प्रत्येकाची चाचणी केली जाईल पण अनेक ट्रकांमधून चालकांकडून अन्य काही व्यक्तींनाही गोव्यात आणले जाते. ह्या व्यक्ती तपास नाक्यावरील पोलिसांना चुकविण्यासाठी मध्येच कुठे तरी उतरतात व मग जंगलातून थोडे चालत आडवाटेने गोव्यात येतात. अशा व्यक्तींची कोरोना चाचणी होऊ शकणार नाही.
सत्तरी- डिचोली अशा तालुक्यांमधून तसेच, मोलेच्या भागातून आडवाटेने गोव्यात प्रवेश करणारे संख्येने कमी नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सीमेवर प्रत्यक्ष चाचणी होणार नाही. सीमेवर फक्त संबंधित व्यक्तीचे थ्रोट स्वॅब गोळा केले जाईल व त्या व्यक्तीची सगळी माहिती लिहून ठेवून त्या व्यक्तीला घरी किंवा त्याच्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊ दिले जाईल.
जर त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरच त्या व्यक्तीला पुन्हा शोधले जाईल. तोपर्यंत ही व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आली व किती ठिकाणी फिरली याची कोणतीही माहिती आरोग्य खात्याच्या यंत्रणोकडे नसेल. तशी माहिती ठेवणे हे अशक्यच काम आहे, हे आरोग्य खात्याचे काही कर्मचारी व पोलिसही मान्य करतात.
रेल्वे किंवा विमानातून जे प्रवासी येतील, त्यांच्याबाबतही असेच घडणार आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना याविषयी 'लोकमत'ने विचारले असता, प्रत्येकाला आम्ही गोव्यात आल्यानंतर अगोदरच क्वारंटाईन करून ठेवू शकत नाही. थ्रोट स्वॅब गोळा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढे जाऊ द्यावेच लागेल. चाचणी अहवाल येईपर्यंत आम्ही प्रत्येक व्यक्तीला अडवून ठेवू शकत नाही. सहा तास तरी अंतिम अहवाल येण्यासाठी लागतात. प्रत्येकाला क्वारंटाईन करण्यासाठी रोज मोठ्या संख्येने जागा लागतील. ते शक्य नाही, असे राणे म्हणाले.
दरम्यान, राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत गेली आहे. गुरुवारपर्यंत चौदा हजारपेक्षा जास्त चाचण्या पार पडल्या.