पणजी : गोव्यात कोरोना विषाणूविरोधी काळजी घेताना सरकारने येत्या सोमवारपासून दि. 31 मार्चर्पयत सर्व विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. सिनेमागृहे, कॅसिनो, व्यायामशाळा, स्पा, पर्यटक जहाजांमधील जलसफरीही बंद राहतील, अशी कृती योजना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावर शनिवारी दुपारी बैठक झाली. मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत आरोग्य मंत्री विश्वजित राणो, मुख्य सचिव परिमल रे, आरोग्य खात्याचे संचालक, पर्यटन संचालक, दोन्ही जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव वगैरे सहभागी झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री राणो यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.
कोरोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटसह अनेक ठिकाणी सापडत आहेत. अशावेळी गोमंतकीयांनीही गाफील राहू नये म्हणून येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व अंगणवाडय़ा, प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये बंद राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दि. 31 मार्चर्पयत ही बंदी लागू असेल. त्यानंतर सरकार स्थितीचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेईल. सार्वजनिक वापराचे जलतरण तलाव, क्लब्स, डिस्को, कॅसिनो हेही दि. 31 मार्चर्पयत बंद असेल. याविषयीचे लेखी आदेश लवकरच जारी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा सुरू राहतील-
शालांत मंडळाच्या व अन्य परीक्षाही सुरू राहतील. कोणत्याही इयत्तेतील विद्याथ्र्याच्या जर परीक्षा असतील तर त्या परीक्षा ठरल्या वेळापत्रकानुसारच होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आम्ही बंद खोलीत जे वर्ग किंवा सोहळे होतात ते बंद करण्याचा निर्णय घेतला. शिगमोत्सव बंद केला नाही, कारण तो बंद खोलीत होत नाही, तो खुल्या जागेत होतो. स्थानिक शिगमोत्सव समितींना योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. शिगमोत्सव मिरवणुका सुरू ठेवाव्यात की नाही हे त्या समित्या ठरवतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
सभा, एकत्रिकरण टाळा-
राज्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुका होत आहेत. अशावेळी लोकांनी व राजकीय पक्षांनी मोठय़ा सभा टाळाव्यात. जिल्हाधिकारी तर सभा घेण्यास परवानगी देणार नाही. आम्ही तसा निर्णय घेतला आहे. लोकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्रीकरण करू नये. राज्यातील रेस्टॉरंट्स सुरू राहतील. विवाह सोहळेही सुरू राहतील. चर्च संस्था किंवा मंदिरे, मशीदी यांनी एकत्रिकरणाचे कार्यक्रम शक्य तो करू नयेत असे सल्ले आम्ही आरोग्याच्या काळजीस्तव देत आहोत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.