सद् गुरू पाटील - पणजी : गोवा सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये (गोमेकॉ) ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी २६ कोरोना रुग्ण मृत झाले असतानाच बुधवारी पहाटे चार तासांत ऑक्सिजनअभावी आणखी २१ रुग्ण दगावले. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी केली. चोवीस तासांत गोव्यात कोरोनामुळे ७० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.या हॉस्पिटलच्या १२२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन संपले असून मदतीसाठी विनंती करण्यात आली. पण पुरेसे सिलिंडर नसल्याने काही झाले नाही. बुधवारी पहाटे येथे ६०० सिलिंडर्स येतील, अशी अपेक्षा होती परंतु ३०५ सिलिंडर्सच आले. लोकांचे जीव जात असूनही हॉस्पिटल प्रशासन उपाय करीत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना बुधवारी झापले.
हॉस्पिटल अपयशी ठरल्याची कबुलीपहाटे दोन ते सहा या वेळेत रुग्ण अधिक प्रमाणात का दगावतात, असे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हॉस्पिटलचे डीन यांना विचारले. त्यावर उत्तर देताना, हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना सातत्याने तसेच अखंडितपणे ऑक्सिजन पुरवण्यात हॉस्पिटल प्रशासन अपयशी ठरते, अशी कबुलीच डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.