भारतामध्ये काही राज्यात कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आला होता. त्यामुळे लॉकडाऊन हटवून अनेक ठिकाणी परिस्थीती पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाने धडक दिली आहे. गोवा हे कोरोनामुक्त राज्य असल्याचे घोषित करण्यात आले होते. सगळ्यात आधी कोरोनामुक्त होणारे राज्य म्हणून गोव्याची नोंद झाली होती. मात्र आता लॉकडाऊन हटवणे गोव्यालाही महागात पडणार असेच दिसतेय. गोव्यात ३ एप्रिलला कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता. म्हणजेच ४० दिवसांनंतर गोव्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे.
सात रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर १७ एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. मात्र आता इथे संकट वाढण्याचे चिन्हं आहेत. पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांपैकी पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर हे कुटुंब महाराष्ट्रातून गोव्यात परतले होते. त्याशिवाय आणखी दोन पॉझिटिव्ह ट्रकचालकही आहेत. तसेच लॉकडाऊनदरम्यान ६ हजार ५०० पर्यटक मायदेशी परतले होते. यांच्यातले बहुसंख्य पर्यटक जर्मनी, इटली, पोलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंडहून आले होते. राज्यात घरोघरी जाऊन पाहणी करण्यात येत आहे. १०० व्हेंटिलेटरचा सेटअपही आधीच लावला होता. ही संख्या वाढवून ४०० करण्यात आली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही पर्यटन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहीप्रमाणात कोविड नियमांसह गोव्यातील बाजारपेठ आता खुली झाली आहे. पणजीची बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे.