पणजी : कोरोना विषाणूची लागण झाली असावी अशा संशयावरून बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात एकूण तिघा पर्यटकांना दाखल करून घेण्यात आले आहे. स्वतंत्र विभागात त्यांची सोय केली गेली आहे. त्यात एका ब्रिटिश नागरिकाचाही समावेश आहे.
कोरोना विषाणूचे हे तिथे संशयीत रुग्ण आहेत. त्यांच्याविषयी विविध चाचण्या झाल्यानंतर निष्कर्ष काय ते येतील. बुधवारी दोघा संशयीतांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यात मलेशीयाहून गोव्यात आलेल्या एका पर्यटकाचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी एक ब्रिटिश नागरिक दाखल झाला. एकूण तिघांना कॉरोन्टाईन केले असल्याचे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले. तिघा संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
दरम्यान, दाबोळी विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कोणतीच व्यवस्था अजून सरकारने केली नसल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आपला एक नातेवाईक कालच विदेशातून गोव्यात आला. त्याने आपल्याला दाबोळी विमानतळावरील गोंधळाची माहिती दिली. विमानतळावर फक्त एक बोर्ड लावला गेला आहे. त्या बोर्डकडे कुणीच अधिकारी किंवा कर्मचारी नाहीत. जर कुणी ठराविक देशांना भेट देऊन आला असेल, तर त्या व्यक्तीने तपासणीसाठीच्या काऊंटरकडे जावे असे त्या बोर्डवर लिहिले गेले आहे पण त्या बोर्डकडे कुणीच माणसे म्हणजेच कर्मचारी नसल्याने पर्यटक तपासणीसाठी न येता सरळ बाहेर निघून जातात.
कारण 48 तास कॉरोन्टाईन होण्याच्या भीतीपोटी कुणीच स्वत:हून तपासणीसाठीच्या काऊंटरकडे येऊ पाहत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे लक्ष द्यावे, असे सरदेसाई म्हणाले. मडगावचे हॉस्पिसियो इस्पितळ मोडकळीस आले आहे व तिथे सरकार कोरोनासंबंधी संशयीत रुग्णांसाठी विभागाची व्यवस्था करील हे सरकारचे विधान म्हणजे विनोद असल्याचेही सरदेसाई म्हणाले.