पणजी : राज्यात आणखी दोघा आमदारांना सोमवारी कोविडची बाधा झाली. विधानसभेच्या चाळीसपैकी आठ सदस्यांना आतार्पयत कोविडची लागण झाली. त्यापैकी सहाजण कोविडवर मात करत ठीकही झाले.सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांची कोविड चाचणी सोमवारी पॉझिटिव्ह आली. टोनी हे सतत विविध रुग्णांना मदत करत असतात. त्यामुळे त्यांचा बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात व इतरत्र वावर असतो. आपल्याला कोविडची लागण झाली असे टोनी यांनी सोमवारी सायंकाळी लोकमतला सांगितले. दोनापावल येथील खासगी इस्पितळात टोनी दाखल झाले आहेत.आमदार सोपटे यांना कोविडची लक्षणो दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी होम आयसोलेशन स्वीकारले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर, रवी नाईक, चर्चिल आलेमाव, क्लाफास डायस अशा आमदारांनाही कोविडची लागण झाली. क्लाफास हे कोविड झालेले पहिले आमदार होते. मुख्यमंत्री सांवत यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी अजून संपलेला नाही. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना अलिकडेच कोविडमुळे महिनाभर इस्पितळात घालवावा लागला. काही मंत्री व अन्य आमदारांनीही स्वत:ची कोविड चाचणी करून घेतली आहे.दरम्यान, राज्यात कोविडमुळे आतार्पयत एकूण 300 रुग्णांचा जीव गेला आहे. काही युवकांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांना जीव गमवावा लागला. रोज पाचशे ते सातशे नवे कोविडग्रस्त राज्यात आढळत आहेत. तसेच रोज पाच ते सातजणांचा कोविडमुळे बळी जात आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत अठराजणांचा कोविडने जीव घेतला. यामुळे सरकारची आरोग्य यंत्रणा टीकेचे लक्ष्य बनली आहे.
CoronaVirus News: गोव्यात आणखी २ आमदार कोरोना पॉझिटिव्ह; बाधित आमदारांची संख्या ८ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 8:31 PM