कुंकळी: कुंकळी औद्योगिक वसाहतीतल्या शिर्डी स्टील्स या कारखान्यात सोमवारी आणखी 25 कामगार पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी या वसाहतीतील आणखी दोन कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.दरम्यान, या वसाहतीत कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांची संख्या 71 वर पोहोचली असून सध्या वसाहतीपूर्ती मर्यादित असलेली ही साथ गावात फैलावण्याची भीती व्यक्त होत असून ही वसाहत ताबडतोब कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करा अशी मागणी स्थानिकांकडून वाढू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी या कारखान्यातील 126 कामगारांची चाचणी करण्यात आली होती त्यांचा सोमवारी अहवाल आला असता त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जे कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले असून इतराना कारखान्यातच विलग अवस्थेत ठेवायचा आदेश दिला आहे. या कामगारांना बाहेर फिरण्यासाठी मज्जाव केल्याचे त्यांनी सांगितले.या वाढत्या प्रकरणावर स्थानिक नगरसेवक शशांक देसाई यांनी भीती व्यक्त केली करताना ही वसाहत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून या वसाहतीच्या सीमा बंद केल्या नाहीत तर हा प्रसार गावात होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली.याच वसाहत परिसरात राहणारी एक बाई तीन दिवसापूर्वी बाधित आढळून आली होती. याच परिसरात दाटीवाटीने सुमारे 150 पेक्षा जास्त लोक राहत असून त्यांची त्वरित तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वसाहतीतच कोविड केंद्रे सुरू कराकुंकळी औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा उद्रेक झालेला असल्याच्या पार्श्वभूमीवर या औद्योगिक वसाहतीतच कोविड निगा केंद्रे सुरू करा अशी मागणी आपचे एल्विस गोम्स यांनी केली आहे. कुंकळी, वेरणा आणि झुवारीनगर या वसाहतीत जास्त पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे उद्योगांनी स्वतःच्या सीएसआर निधीतून ही केंद्रे सुरू करावीत आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना उपचारासाठी साहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.