पणजी : गोव्यात बनावट मास्कविरुद्धची मोहीम वजन मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी चालूच ठेवली असून बोगस वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचे आणखी २९५६ पॅक जप्त करण्यात आले. उत्पादनाची तारीख किंवा अन्य कोणतीही माहिती या पॅकवर नव्हती तसेच हे मास्क नियमानुसार स्टॅण्डर्ड नव्हते. हे मास्क चिनी बनावटीचे असल्याचा संशय आहे. धक्कादायक म्हणजे औद्योगिक वापरासाठीचे मास्कही बाजारात ‘कोरोना’ प्रतिबंधक म्हणून विकले जात आहेत. वास्को येथील वजन माप निरीक्षक नीतीन पुरुषन यांनी नियंत्रक प्रसाद शिरोडकर व साहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांच्या मार्र्गदर्शनाखाली ही कारवई करण्यात आली. पुरुषन यांनी दिलेल्या माहितीनुसार २00९ च्या वजन माप कायद्याच्या कलम १८ (१) तसेच २0११ च्या पॅकबंद वस्तू नियम ४, ६ आणि १८ (१) खाली ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार झुवारीनगर येथे एका फार्मसीमध्ये बनावट मास्क विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर अधिकाºयांनी हा छापा टाकला. तेथे हार्डवेअर दुकानातून हे मास्क खरेदी केल्याचे सांगण्यात आले. या हार्टवेअर दुकानावर छापा टाकण्यात आला. साधे तसेच सीएन नाइन्टीफाइव्ह व अन्य प्रकारचे मास्क जप्त करण्यात आले. या मास्कच्या पॅकवर कोणतीही माहिती नव्हती.दरम्यान, मास्क खरेदी करताना ते औद्योगिक वापराचे नाहीत याची खात्री करुन घ्यावी तसेच पॅकवरील माहितीची खातरजमा करुनच खरेदी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.मास्क खरेदी करताना खालील गोष्टींची खातरजमा करा१. उत्पादक किंवा आयातदार अथवा पॅकिंग करणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता२. मूळ कुठल्या देशात उत्पादन केलेले आहे.३. उत्पादनाचा महिना आणि वर्ष किंवा पॅकिंंगपूर्व तारीख अथवा आयात केल्याची तारीख ४. कमाल किरकोळ दर (सर्व करांसह) ५. कस्टमर केअर तपशील
Coronavirus: गोव्यात बनावट मास्कचे २९५६ पॅक जप्त; छापासत्र सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 8:54 PM