पणजी : लॉक डाऊनच्या काळात ज्या विदेशी व्यक्ती व पर्यटक गोव्यात अडकले होते, त्यांना आतापर्यंत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात गोवा सरकारला यश आले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्य़ा 19 विमानांद्वारे एकूण 3314 विदेशी पर्यटक गोव्याहून मायदेशी गेले. सरकारने मुख्य सचिव परिमल रे यांच्या अध्यक्षतेखाली जी एक महत्त्वाची समिती (एसईसी) स्थापन केली आहे, त्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली गेली. समितीच्या सातत्याने बैठका होत आहेत. प्रधान सचिव पुनीत गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाषचंद्रा, अर्थसचिव दौलतराव हवालदार आदी अनेक आयएएस अधिका-यांनी बैठकीत भाग घेतला.गोव्यातील कृषी क्षेत्रचा व कृषी उपक्रमांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. कृषी उत्पादने बाजारात आल्यानंतर त्यास ग्राहक मिळावेत म्हणून कृषी खात्याने मार्केटिंग फेडरेशनशी समन्वय ठेवावा असे बैठकी त ठरले. राज्यात 19 हार्वेस्टर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आठ हार्वेस्टरांचे काम सुरू झाले आहे. पुढील मोसमासाठी शेतक-यांना बियाणो उपलब्ध करून देण्याचेही काम सुरू आहे अशी माहिती कृषी सचिवांनी बैठकीत दिली.हार्वेस्टिंगच्या कामासाठी गोव्याबाहेरून कुणीच व्यक्ती येणार नाही, कामगार येणार नाहीत या दृष्टीने काळजी घेतली जावी अशी सूचना मुख्य सचिवांनी बैठकीत केली.राज्याच्या सीमा सिल आहेत. सरकारी सुविधांच्या ठिकाणी निगराणीखाली आता आठ व्यक्ती राहिल्या आहेत. त्यापैकी पाच मडगाव रेसिडन्सीमध्ये व तीन जुनेगोवे रेसिडन्सीमध्ये आहेत व त्यांची स्थिती ठीक आहे, अशी माहितीही बैठकीत दिली गेली. सीमांवर जे तपास नाके आहेत, तिथे असलेल्या मनुष्यबळाला पाठिंबा देण्यासाठी योग्य असे तंबू उभे केले जावेत अशी सूचना बांधकाम खात्याच्या अधिका-यांना बैठकीत केली गेली. स्टेट बँकेने एटीएम ऑन व्हील सेवा सुरू केली आहे. बँकेकडून अशा पद्धतीचा आणखी एक एटीएम लवकरच सुरू केला जाईल, असे अर्थ सचिवांनी बैठकीत स्पष्ट केले.
Coronavirus : 314 विदेशी गोव्याहून 19 विमानांमधून मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 7:39 PM