वास्को: गोव्यातील विविध ठिकाणच्या इस्पितळांतून ६० रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातील ‘वायरोलॉजी’ प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. सदर नमुने शुक्रवारी (दि. 27) उशिरा रात्री भारतीय नौदलाच्या ‘डोनियर एअर क्राफ्ट’ने पाठवण्यात आले असून गोवा आरोग्य खात्याच्या तंत्रज्ञानांच्या निगराणीखाली ते पुण्यात पाठवण्यात आले आहेत.गोव्यात नुकतेच तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना इस्पितळात क्वारंटाइन करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ‘लॉकडाऊन’ बरोबरच इतर पावले उचलली आहेत.
भारतीय नौदलाचे संपूर्ण सहकार्यदेशतील समुद्र क्षेत्रची चोख सुरक्षा ठेवण्याबरोबरच आपत्कालीन स्थितीत भारतीय नौदलाचे जवान नागरिकांना सहकार्य - मदत करण्यासाठी उचित पावले उचलताना अनेक वेळा दिसून आले आहे. आताही कोरोनाविरोधी लढ्यात भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. 25 मार्च रोजी गोव्याच्या आरोग्य खात्याच्या चार डॉक्टरांना ‘कोविड 19’ च्या चाचणीचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘डोनियर एअर क्राफ्ट’ आयएनएस तळावरून पुण्याला रवाना झाले होते. प्रशिक्षण घेतल्यानंतर नौदलाचे एअरक्राफ्ट या डॉक्टरांना घेऊन पुन्हा गोव्यात पोचले. यानंतर गोव्यातील आरोग्य खात्याच्या कर्मचा:यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ ने ६० हजार मास्क उपलब्ध केले होते. दिल्ली येथे सदर मास्क उपलब्ध केल्यानंतर संपूर्ण देशात सध्या ‘लॉकडाऊन’ करण्यात आल्याने ते रस्त्याने पाठवणे अशक्यच होते. यामुळे असोसिएशनच्या अध्यक्षांनी भारतीय नौदलाशी सदर मास्क गोव्यात आणण्यासाठी मदत मागितल्यानंतर भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने त्वरित पावले उचलून मदतीचा हात दिला.