पणजी : गेल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण देशात गोवा सुरक्षित व कोरोनामुक्त मानला जात होता पण रेल्वे सुरू होताच गोव्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास आरंभ केला. सोमवारी सकाळी राज्यात 9 नवे रुग्ण सापडले. परिणामी गोव्यात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 31 झाली आहे. गोव्यात मुंबई व दिल्लीहून मिळून एकूण तीन रेल्वेगाड्या आल्या. त्यातून सुमारे दीड हजार प्रवासी आले. काहीजण मूळ गोमंतकीय आहेत. 31 रुग्णांपैकी वीसजण हे रेल्वेतून आलेले आहेत. सोमवारी 9 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला दिली.सोशल मीडियावरुन गोमंतकीयांनी सरकारवर टीका चालवली आहे. गोव्यात रेल्वे येणे बंद करा अशी मागणी गोमंतकीय करत आहेत. तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मते गोव्यात कोरोनाचा अजून सामाजिक प्रसार झालेला नाही व त्यामुळे गोमंतकीयांनी घाबरू नये. जे रुग्ण सापडले ते सगळे गोव्याबाहेरुनच कोरोना व्हायरस घेऊन आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
coronavirus: गोव्यात सापडले ९ नवे कोरोनाबाधित, रुग्णसंख्या ३१ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:41 AM