पणजी : गोव्यात कोविडमुळे तेवीसाव्या बळीची सोमवारी नोंद झाली. सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा हा पहिला बळी ठरला. मृत व्यक्तीचे वय अवघे 29 आहे पण त्यास मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता. इंदिरानगर चिंबलमधील कंटेनमेन्ट झोनमधील हा युवक आहे.यापूर्वी 31 वर्षीय तरुणाचा बळी कोविडमुळे गेला होता. मात्र यावेळी 29 वर्षीय युवकाचा बळी गेल्याने गोमंतकीयांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. या युवकाची अगोदरच मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज सुरू होती व त्यात त्याला पुन्हा कोविड झाल्याने त्याचा बळी गेला, असे आरोग्य खात्याच्या एका अधिका:याने लोकमतला सांगितले. चिंबलच्या भागातील हा कोविडचा दुसरा बळी ठरला आहे. चिंबल व इंदिरानगर या दोन्ही भागांमध्ये मिळून 94 कोविडग्रस्त आहेत. चिंबलच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने तशी नोंद केली आहेत. यापूर्वी काही रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.गोव्यात गेल्या दोन महिन्यांतच कोविडचे रुग्ण वाढले व बहुतांश बळी गेल्या पंधरा दिवसांतच गेले आहेत. तेवीसपैकी सुमारे सोळा बळी हे मुरगाव तालुक्यातील कोविडग्रस्तांचे आहेत. मुरगाव तालुक्यात सध्या लॉकडाऊन आहे. त्या तालुक्यात कोविडग्रस्तांची संख्या सुमारे साडेपाचशे आहे. कोविडमुळे बळी गेलेले बहुतांश रुग्ण हे साठ व त्याहून जास्त वर्षे वयाचे आहेत. काही महिला रुग्णांचाही कोविडने बळी घेतला. तिघांना मृत स्थितीत आणल्यानंतर मग शवचिकित्सेवेळी ते कोविडग्रस्त होते हे स्पष्ट झाले. मडगावमध्ये एका भिका:याचाही कोविडने बळी घेतला.मडगावचे कोविड इस्पितळ हे 220 खाटांचे असून त्यापैकी 45 टक्के खाटा रिकाम्या असल्याचे सांगितले जाते. 90 वर्षाच्या दोन व्यक्ती मात्र कोविडवर मात करण्यात यशस्वी झाल्या. त्यांच्यावर कोविडच्या इस्पितळात यशस्वी उपचार झाले.
CoronaVirus News: गोव्यात कोविडचा २३वा बळी; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:32 PM