पणजी : गोव्यात कोरोनाचा सहावा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आफ्रिकेहून आलेल्या गोमंतकीय व्यक्तीची गोमेकाॅ इस्पितळात वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा अहवाल कोविड-19 पाॅझिटिव्ह आला आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.
कोरोनाचा रुग्ण ठरलेला हा इसम गेल्या 19 मार्चला गोव्यात आला होता. त्याला थंडी ताप होता व गोमेकाॅ इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आता आला. त्याचे कुटुंबीय व इतर ज्या व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या त्यांना शोधून काढून वैद्यकीय निगराणीखाली ठेवले जाणार आहे.
दुसर्या एका घटनेत गोमेकाॅतील कोविड 19 वाॅर्डमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. त्याची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली होती. त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. दरम्यान, बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात जे पाच पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्यापैकी दोघांची वैद्यकीय चाचणी गोमेकाॅच्या प्रयोगशाळेत गुरुवारी केली. त्यावेळी दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. म्हणजेच, हे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि कोणताच संशय राहू नये म्हणून पुन्हा आज शुक्रवारी या रुग्णांची नव्याने कोरोना चाचणी करून पाहिली जाईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.