पणजी: मुंबईहून ज्या 60 गोमंतकीय खलाशांना गोव्यात आणण्यात आले, त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्यांच्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी दुपारी आला.
मारेला जहाजावरील हे खलाशी दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईन करून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी नमूने घेतले गेले होते. चाचणीचा अहवाल येणो बाकी होते. साठ अहवाल आले. दोन चाचण्यांवेळी तांत्रिक समस्या आली. त्यामुळे दोन चाचण्या पुन्हा केल्या जातील. त्या दोनच चाचण्यांचे अहवाल येणो बाकी आहेत, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी सांगितले. साठ चाचण्या गोमेकॉतील प्रयोगशाळेत करण्यात आल्या. गोव्यात या खलाशांना पाठविण्यापूर्वीही मुंबईत त्यांची चाचणी झाली होती.
दरम्यान, मुंबईत आणखी दोन जहाजांवर खलाशी आहेत. त्यांनाही गोव्यात आणले जाईल पण त्यांच्या कोरोना चाचण्या अजून झालेल्या नाहीत. सरकारने या सर्व गोमंतकीय खलाशांसाठी क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध केली आहे. फक्त एकाच हॉटेल मालकाने आपले हॉटेल मोफत वापरण्यासाठी दिले आहे. इतर हॉटेल्स म्हणजे पेड क्वारंटाईन आहे.