पणजी - गोव्यात कोविडमुळे मृत्यू होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज कोविडग्रस्तांचे मृत्यू होत आहेत व लोकांमधील भीतीही वाढत चालली आहे. गेल्या चार दिवसांत आठ मृत्यू झाले. चाळीस ते पन्नास या वयोगटातील रुग्ण कोरोनामुळे आतापर्यंत पाचजण गेले आहेत. मंगळवारी मृत झालेला रुग्ण 47 वर्षे वयाचा आहे.सोमवारी एकूण तिघा कोविडग्रस्तांचे मृत्यू झाले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजता मडगावच्या कोविड रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती चिखली येथील आहे. त्यास गेल्या 29 जून रोजी रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्याची झुंज सुरू होती. त्याला वेन्टीलेटरवर ठेवले गेले होते.कोविड इस्पितळात रात्री उशिरा आणखी एकाचा मृत्यू झाला पण तो रुग्ण शेवटच्या चाचणीवेळी निगेटिव होता व त्यामुळे त्याला कोविडमुळे मृत्यू झाला असे म्हणता येत नाही. कोरोनामुळे मृत्यू होणा-यांमध्ये विविध वयोगटातील पुरुष व महिला आहेत. कोविडमुळे मरण पावलेल्या एकूण अठरापैकी दहा व्यक्ती ह्या साठ वर्षाहून जास्त वयाच्या आहेत. 80 वर्षाहून अधिक वयाचे तिघे कोविड रुग्ण यापूर्वी मरण पावले. 70 ते 80 या वयोगटातील चौघे मरण पावले. 60 ते 70 वर्षे या वयोगटातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. पन्नास ते साठ या वयोगटातील दोघांचा कोरोनाने जीव घेतला. चाळीस ते पन्नास या वयोगटातील पाचजणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. चाळीस वर्षाहून कमी म्हणजे 31 वर्षाच्या एका युवकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आतार्पयत 92 हजाराहून जास्त व्यक्तींची कोविड चाचणी गोव्यात केली गेली. सरासरी ०.61 टक्के व्यक्तींचे बळी गेले. याचाच अर्थ बहुतांश कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. एकूण सरासरी 59.6 टक्के कोविडग्रस्त कोविडमुक्त झाले व घरी गेले. ज्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती किंवा ज्यांना उच्च रक्तदाब, कॅन्सर किंवा मूत्रपिंडाचा विकार होता किंवा ज्यांना पक्षाघाताचा झटका आला होता व कोविडही झाला होता, अशा रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले व असे बहुतांश रुग्ण हे मुरगाव तालुक्यातीलच आहेत. वास्को, बायणा, सडा, नवेवाडे, खारीवाडा व मांगोरहील येथे प्रचंड भीतीचे वातावरण आहे. मांगोरहीलला गेले 47 दिवस कंटेनमेन्ट झोन आहे.
coronavirus: कोरोनाने गोव्यात घेतला अठरावा बळी, गेल्या चार दिवसांत आठ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:58 PM