पणजी - गोव्यात कोविडमुळे गेल्या 24 तासांत दोन मृत्यू झाले. यामुळे मरण पावलेल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या 41 झाली आहे. 62 वर्षीय आणि 71 वर्षीय अशा दोघा इसमांचा मृत्यू झाला आहे. या दोघांनाही मूत्रपिंडाचे विकार होते.गोव्यात गेल्या सहा दिवसांत किमान एक हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. मोठ्या संख्येने कोविडग्रस्त आजारातून बरे होत असतानाच ज्यांना मूत्रपिंडाचा किंवा हृदयाचा विकार आहे अशा कोविडग्रस्तांचे मात्र बळी जात आहेत.आतार्पयत दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील कोविडग्रस्तांपैकी अनेकांचे बळी गेले. त्यानंतर सासष्टी तालुक्याचा क्रमांक लागतो. एका मुरगाव तालुक्यात सुमारे सातशे कोविडग्रस्त आहेत. जे 41 बळी आतार्पयत गेले, त्यापैकी 85 टक्के व्यक्ती मुरगाव तालुक्यातील आहेत. गुरुवारी जे दोन इसम मरण पावले, त्यापैकी दोघांनाही मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता पण ते कोविडग्रस्त होते व कोविड इस्पितळात त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकटा मुरगाव तालुक्यातील तर दुसरा सासष्टी तालुक्यातील आहे.गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या गेल्या दोन महिन्यांत वाढत गेली. गोवा कधी तरी ग्रीन झोनमध्ये होता हे देखील आता गोमंतकीयांना खरे वाटेनासे झाले आहे. एकूण दीड हजारहून जास्त सक्रिय बाधित कोविडग्रस्त गोव्यात आहेत. साडेपाच हजार लोकांना कोविडची बाधा झाली व त्यापैकी 3 हजार 784 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. आतापर्यंत 41 व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याने त्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. सुमारे पावणे चार हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले ही स्वागतार्ह गोष्ट मानली जात आहे. काल बुधवारी 189 व्यक्ती कोविडच्या आजारातून ब-या झाल्या.
coronavirus: गोव्यात कोरोनामुळे 24 तासांत 2 मृत्यू, कोरोनावळींची एकूण संख्या 41 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:49 PM