पणजी : राज्यात कोविड रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अंमलात असेल. सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी वगैरे सगळे कार्यक्रम रद्द ठरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत खुली राहतील.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषद घेतली व कडक कर्फ्यूची घोषणा केली. लोक घरी राहतच नाहीत, अकारण फिरतात. त्यामुळे पोलिसांना लाठीचा देखील वापर करावा लागतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या रविवारी सकाळपासून दि. २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल. कुणीच घराबाहेर पडू नये. फक्त सरकारी व खासगी इस्पितळ कर्मचाऱ्यांना कामासाठी जावे लागेल. त्यांना कुणी अडथळे आणू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. रेस्टोरंट्स नव्हे तर टेक अवे सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत पंधराही दिवस खुली असतील. त्यामुळे लोकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. अन्य जे व्यवहार बंद राहतील त्याविषयीचा आदेश तपशीलाने आज शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जारी करतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.विवाह सोहळे सुपरस्प्रेडर राज्यात विवाह सोहळे कोविडसाठी सुपरस्प्रेडर ठरले. पन्नास लोकच विवाहात सहभागी व्हा असे सरकारने सांगून देखील लोकांनी गर्दी केली. नवरा किंवा बायकोला कोविड झालेला आहे असे कळून आल्यानंतर देखील लोक लग्नाला गेले व कोविडग्रस्त झाले अशी उदाहरणे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सर्वांनी विवाह, काजरा, मुंजी वगैरे कार्यक्रम रविवारपासून रद्द करावेत. कुणीच कसलाच व्यक्तीगत किंवा कौटुंबिक कार्यक्रम सध्या करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पर्यटकांना नो कोविडची सक्ती राज्यात जे पर्यटक येतील त्यांनी नो कोविड प्रमाणपत्र घेऊन यावे. जर असे प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी कोविड लसीकरण केले असल्याचा पुरावा सादर करावा असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले. कर्फ्यूवेळी औषधालये सुरू राहतील. त्यांना वेळेचे बंधन नसेल. कारण नसताना जर कुणी रस्त्यावर फिरताना आढळला तर पोलिस कारवाई करतील. कोविडची चेन ब्रेक करण्यासाठी हा उपाय आहे, असे ते म्हणाले.
Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढल्याने गोव्यात रविवारपासून कर्फ्यू, विवाहासह सर्व सोहळे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 8:19 PM