पणजी : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर इस्पितळात काम करणाऱ्या गोमंतकीय कन्या डॉ. दिव्या पै गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. दिव्या यांचे आयुष्य सुव्यवस्थित चालले होते. अचानक कोरोनाचे संकट आले पण त्या विचलित झाल्या नाहीत. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत.पुण्यातील भारती विद्यापीठामध्ये त्यांनी २०१५ मध्ये एमबीबीएस आणि २०१८ मध्ये एमडी अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१९ पर्यंत त्यांचा एक वर्षाचा करार होता. सप्टेंबर २०१९ मध्ये दीनानाथ मंगेशकर इस्पितळात भूलतज्ज्ञ (अॅनेस्थिओलॉजिस्ट) म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या. डिसेंबर महिन्यात घरात त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. वर संशोधन झाल्यावर मार्च महिन्यात साखरपुडा आयोजित केला होता. सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असताना कोरोनासारखे महासंकट उभे ठाकले आणि दिव्या यांच्या वेळापत्रकाला गालबोट लागले.दिव्या या भूलतज्ज्ञ आहेत. त्यामुळे कोविड टीममध्ये त्याही असतील, असे त्यांना वाटले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देताच सर्वप्रथम त्यांच्यासाठी हे धक्कादायक होते. देश कोरोनाविरोधात लढतोय, अनेक आरोग्य अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. हे पाहून त्यांनी कोविड टीममध्ये सहभागी होणार असल्याचे घरातील लोकांना कळवले.त्या म्हणाल्या, माझे लग्न ठरले होते. या इस्पितळात मी अनुभवासाठी काम करत होते. त्यामुळे बाबांनी मला पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला. लग्नही लवकरच होणार होते म्हणून नोकरी सोडून गोव्यात परतण्याचे त्यांनी सुचवले. नियोजित वराच्या कुटुंबीयांनीही हा पर्याय ठेवला होता. पण माझा निर्णय ऐकून त्यांनीही तो पर्याय स्वीकारला. मागील तीन महिन्यांपासून माझे कुटुंबीय माझ्याजवळ नसले तरी फोनच्या माध्यमातून ते माझ्यासाठी आधारस्तंभ बनले आहेत.सध्या डॉ. दिव्या पुण्यात एकट्याच राहतात. घरकाम, स्वयंपाक या गोष्टी सांभाळतच त्या कोविड रुग्णांच्यासेवेत आहेत.जबाबदारी महत्त्वाचीमहिला डॉक्टर्ससाठी हा काळ आणखी कठीण बनतो, जेव्हा मासिक पाळी येते. याबाबत त्या सांगतात, एकदा पीपीई किट घातले की झाले. त्याचा पुनर्वापर करता येत नाही. स्वच्छतागृहात पुन्हा पुन्हा जाऊ शकत नाही. काहींना यावेळी पोट दुखत असते. पण कुणीही विश्रांती घेत नाही.पुरुष डॉक्टर आणि आम्हाला एकसारखेच वेतन मिळत असेल तर आमचीही त्यांच्या बरोबरीने सेवा द्यायची जबाबदारी आहे. या कालावधीत काम करताना निश्चितच त्रास होतो. पण आपल्यावर असलेली जबाबदारी याहूनही मोठी आहे.
coronavirus: गोमंतकीय कन्या दिव्या पै आहे पुण्यात कोरोना योद्धा, साखरपुडा झाला, मात्र रुग्णसेवेसाठी विवाह पुढे ढकलला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 5:17 AM