मडगाव - गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करण्यात आला, तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून प्रयोगासाठी गोवेकरांचा ' गिनी पिग' सारखा उपयोग करून त्यांचा जीव धोक्यात घालू नका असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.यासंबंधी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी, सदर औषधे व उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी नेमकी कोणती औषधे वापरण्यात आली व कोणती उपचार पद्धती वापरण्यात आली त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे. सरकारने गोमंतकीय रुग्णांवर प्रयोग करू नयेत व त्यांचे जीवन धोक्यात घालू नये असे म्हटले.गोवा सरकारने जो दावा केला आहे त्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांवर सदर औषधांचा वापर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आयईसीकडून परवानगी घेतली होती का हे सरकारने स्पष्ट करावे. आयुष मंत्रालयाने कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक औषधे व उपचार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता घेतली आहे का हे उघड करावे असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.सरकारने कोरोना विषाणू संबंधी सर्व निर्णय तज्ज्ञांना विचारूनच व त्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत या माझ्या मागणीचा मी पुनरुच्चार करतो. आपण सध्या कठीण व नाजूक अशा काळातून जात असून, खूप विचारपूर्वक सर्व निर्णय घेणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, काल सामाजिक चाचणी घेण्यासाठी नेमलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राच्यावेळी सामाजीक अंतराचे संकेत पायदळी तुडविण्यात आले. आज विविध वर्तमानपत्रातील बातम्या बघून लोकांनी या चाचणीचा धसकाच घेतला आहे. सरकारने सुरक्षाकवच न देताच कर्मचाऱ्यांना चाचणीस पाठवल्यास गोव्यात कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटण्यास वेळ लागणार नाही हे ध्यानात ठेवावे. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक चाचणीचा विचार बदलून सामाजिक स्क्रीनिंग व चाचणी करण्याचा निर्णय घेणेच योग्य ठरेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
Coronavirus : गोवेकरांचा ' गिनी पिग' सारखा प्रयोगासाठी वापर नको; आयुर्वेदिक उपचार पद्धतीला काँग्रेसची हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 4:32 PM