पणजी - गोव्यात पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा अशा प्रकारचा दबाव हा उद्योग क्षेत्रकडून येत होता. अनेकांच्या नोकऱ्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा लागला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.पर्यटन धंदा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हता व नाही. सर्व आर्थिक उपक्रम सुरू व्हायला हवेत. ते बंदच ठेवता येणार नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लोक किंवा पर्यटक येतील. आमच्याकडे तपासणी केली जातेच. आंतरराष्ट्रीय पर्यटक म्हणजेच विदेशातून कुणी पर्यटक गोव्यात येणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झालेली नाही. देशांतर्गत व्यवहार सुरू झाल्याने देशी पर्यटक येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यातच सर्वाधिक कोविड चाचण्या होतात.मी साखळीतच राहतो कोविड नियंत्रणात आहे. कोविडची रुग्ण संख्या वाढली असे दिसते, कारण आम्ही मोठय़ा प्रमाणात कोविडच्या चाचण्या करतो. मात्र कोविड नियंत्रणाबाहेर गेलेला नाही. साखळीत काही ठिकाणी कोविडग्रस्त आढळले पण मी साखळीतच राहतो. मी पणजीत राहतो असा चुकीचा दावा एका विरोधी आमदाराने नुकताच केला. मी लोकांना माङया घरी भेटतो. तो आमदार मात्र लोकांना घरीच घेत नाही. मी रोज साखळीला जातो, रात्री साखळीच्याच घरी राहतो, त्या आमदाराने वाटल्यास चहा पिण्यासाठी सकाळी आमच्या घरी यावे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.दरम्यान, पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी विरोध केला. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई यांनीही पर्यटन धंदा नव्याने सुरू करण्यास आक्षेप घेतला. कोविडची रुग्णसंख्या गोव्यात प्रचंड वाढेल. सरकार चुकीचे करतेय. सरकार यापुढे मद्यालयेही सुरू करू पाहत आहे. प्रत्येक व्यवहार सरकार नव्याने सुरू करू पाहतेय, कारण काही मंत्र्यांना विकास कामांवर पैसे करायचे आहेत. काही मंत्र्यांचे रोड शोही सध्या बंद झाले आहेत, असे सरदेसाई म्हणाले.
coronavirus: नोकऱ्या वाचविण्यासाठी घेतला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 8:16 PM