पणजी : राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत निवडणुका रद्द केल्या जाव्यात, अशा प्रकारची मागणी राज्याच्या विविध स्तरांतून केली जात होती. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुका रद्द केल्याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी केली. येत्या 24 रोजी मतदान होणार नाही, हेही यावेळी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयुक्त श्री. श्रीवास्तव यांनी सांगितले की, निवडणूक 24 रोजी अधिसूचित झालेली नाही. त्यामुळे निवडणूक रद्द झाली असा अर्थ होतो. आम्ही निवडणुकीची नवी तारीख अजून निश्चित केलेली नाही. तूर्त जिल्हा पंचायत निवडणुका रद्द झालेल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास उच्चस्तरीय बैठक घेतली होती व 22 मार्चऐवजी 24 मार्च रोजी मतदान पार पडेल, असे जाहीर केले होते. मात्र, सरकारची ही भूमिका राज्य निवडणूक आयोगाला मान्य नाही हे शुक्रवारी स्पष्ट झाले.
निवडणुका कधी घ्याव्यात ते शेवटी निवडणूक आयोग ठरवणार आहे. सरकार फक्त तारीख सूचवू शकते, असे आयोगाच्या सुत्रंनी सांगितले. उद्या रविवारी 22 रोजी जनता कर्फ्यू आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा कर्फ्यू जाहीर केला आहे.
लोकांनी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेर्पयत घरातून बाहेर पडू नये असे अपेक्षित आहे. यामुळे 22 रोजी होणार असलेल्या पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघांतील निवडणुका रद्द झाल्या. 24 रोजीही मतदान प्रक्रिया पार पडणार नाही हे स्पष्ट झाल्याने निवडणूक प्रक्रियेशीसंबंधित सरकारी कर्मचा-यांनीही सुटकेचा श्वास सोडला.
सध्या प्रत्येकालाच स्वत:च्या आरोग्याविषयी धास्ती वाटते व निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी होत होती. मात्र गोवा सरकार कान व डोळे बंद करून बसलेले असले तरी, निवडणूक आयोगाने मात्र निवडणुका रद्दची घोषणा करून गोमंतकीयांना दिलासा दिला.