पणजी - गोव्यात जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे. कर्फूची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद आहे, पण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
केंद्र सरकारने जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार देशाच्या विविध भागांमध्ये धान्याची दुकाने, भाजी विक्रीची दुकाने सुरू आहेत. मात्र गोव्यात सरकारने केंद्राच्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. यामुळे काही आमदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. आम्ही गरजवंत अशा लोकांना धान्य पाठवू पाहतो पण कोणतेच दुकान उघडे नसल्याने व लोकांना वाहतुकही करू मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे काही आमदारांनी सांगितले.
अन्न धान्य लोकांच्या घरापर्यंत पोहचविले जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते पण प्रत्यक्षात गोव्यात कुणालाच सरकारकडून अजून पुरवठा सुरु झालेला नाही. गोमंतकीयांच्या घरी बुधवारी सकाळी दुधाचा देखील पुरवठा झालेला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री रोज निर्णय बदलत राहिले. गोमंतकीयांचा लाॅक डाऊनला पूर्ण पाठिंबा आहे पण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हायला हवा अशी लोकांची अपेक्षा आहे
गोव्याच्या काही भागांत औषधालये तेवढी खुली राहिली. रस्त्यावर पोलिसांचा पूर्ण पहारा आहे. वाहने अडविली जात आहेत. काही नागरिकांवर पोलिसांनी लाठीमारही केला. गोव्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. सुमारे पाचशे प्रवासी घरीच निगराणीखाली आहेत. गोव्यात प्रसार माध्यमांनाही बंधने सहन करावी लागत आहेत. कर्फूच्या काळात गोमंतकीयांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी च सरकारला केली होती पण सरकार गोमंतकीयांसाठी दुधाचा पुरवठा देखील करू शकले नाही.