पणजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनची मुदत आज मध्यरात्रीपासून येत्या ३१ पर्यंत वाढविली आहे. या काळात पूर्णपणे लॉकडाउन व शंभर टक्के कर्फ्यु लागू असल्याने लॉकडाउनच्या काळात सरकार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. पुढील दोन दिवसात त्यासाठी वितरण व्यवस्था निश्चित केली जाईल.
केवळ आणीबाणीच्या सेवाच चालू राहतील. कर्फ्युच्या काळात घराबाहेर पडल्यास कडक कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला, मासळी बाजार, सार्वजनिक वाहतूक बंद राहील, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. गोवा डेअरीची केंद्रेच उघडी असतील आणि तेथेच दूध मिळेल. फार्मसी व इस्पितळे, आरोग्य केंद्रे चालू राहतील. वीज, पाणी आदी सेवा लोकांना मिळतील. त्यासाठी संबंधित खात्याचे कर्मचारी कामावर असतील. मुख्यमंत्री म्हणाले की, कारोना व्हायरस गोव्यात नाही असा समज कोणी करुन घेऊ नये. अजून कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळलेले नाही, हे राज्याच्यादृष्टीने सुदैव आहे. ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये यासाठी कठोर पावले उचलावी लागत असून भाजीपाला, फळे तसेच कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवावी लागत आहे. सरकार अतिरिक्त व्हेंटिलेटर मागविणार आहे.कारोना व्हायरसची ही मोठी आपत्ती असून सर्वांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. लोकांनी घरातच रहावे. कारणाशिवाय बाहेर पडू नये तसेच सरकारकडून वेळोवेळी दिल्या जाणाºया निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. महामारी कायद्याखाली कडक कारवाईचे अधिकार पोलिसांना दिलेले आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करुन गुन्हे नोंदविले जातील. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून याबाबतीत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. सावंत म्हणाले की, अनेकजण ‘कोरोना’च्या बाबतीत गैरसमज पसरवित आहेत. गोव्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
ओपीडी बंद; केवळ गंभीर आजारांवरच उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमित बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद करण्यात आलेली आहे. अपघातग्रस्तांवर किंवा गंभीर स्वरुपाच्या आजारावरच उपचार केले जातील. लोकांनी विनाकारण क्षुल्लक आजारांसाठी इस्पितळांमध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
अंतर ठेवण्याचे भानच नाहीमुख्यमंत्री म्हणाले की, काल मंगळवारी जनता कर्फ्यु शिथिल करुन सकाळी पाच तास लोकांना खरेदीसाठी मुभा दिली परंतु या काळात बाजारपेठांमध्ये लोकांनी तुडुंब गर्दी केली. एकमेकांपासून अंतर ठेवण्याचे (सोशल डिस्टन्स) भानही लोकांना राहिले. ‘कोरोना’च्या फैलावासाठी या गोष्टी पोषक असतात त्यामुळे दुकानेही बंद ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत. लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलिसांनी अॅडव्हायझरी जारी केली आहे.