मडगाव - बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांची पत्नी फातिमा याही पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. सध्या त्यांना दोना पावलच्या मणिपाल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आलेमाव हे कोरोनाच्या कचाट्यात येणारे गोव्यातील चौथे आमदार असून सद्या थिवीचे आमदार नीलकंठ हलर्णकर आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हेही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी कुंकळीचे आमदार क्लाफास डायस हेही बाधित आढळून आले होते. पण आता ते बरे झाले आहेत.मंगळवारी रात्री आलेमाव दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळून आल्याने बुधवारी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्या दोघांमध्येही कोरोनाची बाह्य लक्षणे दिसत नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.आलेमाव हे स्वातंत्र्य दिनानिमित्त पणजी येथे एका सोहळ्याला गेले होते. त्यानंतर त्यांना सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या पत्नीही बाधित झाल्या आहेत. मात्र त्यांच्या घरातील अन्य सदस्य निगेटिव्ह आढळून आले आहेत.यापूर्वी त्यांच्या बाणावली येथील कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता तर त्यांच्या चर्चिल ब्रदर्स या फूटबॉल संघाचे प्रशिक्षकही बाधित झाले होते पण ते दोघेही आता बरे झाले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
coronavirus: गोव्यातील आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 4:15 PM