मडगाव: गोव्यात ठिकठिकाणी कोविड शुश्रूषा केंद्रे सुरू करण्यास स्थानिकांकडून विरोध होत असतानाच नावेली येथील मनोहर पार्रिकर स्टेडियमही कोविड केअर सेंटर म्हणून सुरू करण्याची शक्यता सरकारने ठेवली आहे.
या स्टेडियमची सफाई करण्याचे आदेश देण्यात आले असून सोमवारी ही सफाई सुरू झाली. मडगावच्या सध्याच्या हॉस्पिसिओ इस्पिटलाची इमारतही भविष्यात या कामासाठी वापरण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली असून कोलवा रेसिडेन्सी येथेही सुरू केलेले शुश्रूषा केंद्र चालूच राहणार आहे.
नावेली स्टेडियमबद्दल मडगावचे आमदार दिगंबर कामत याना विचारले असता, असा कुठलाही निर्णय झाला असल्याची आपल्याला माहिती नाही असे ते म्हणाले. पण क्रीडा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्टेडियम संभाव्य केंद्र म्हणून विचारात आहे. खात्याला तसे संकेतही देण्यात आले आहेत.
दरम्यान कोलवा हे पर्यटन स्थळ असल्याने कोलवा रेसिडेन्सी कोविड शुश्रूषा केंद्र म्हणून घोषित करण्याचे स्थगित ठेवावे ही मागणी घेऊन बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी कोलव्याच्या पंच सदस्या बरोबर सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली त्यावेळी सावंत यांनी हॉस्पिसिओचे सर्व विभाग नवीन जिल्हा इस्पिटलात हलविल्यानंतर जुनी इमारत कोविड शुश्रूषा केंद्र म्हणून वापरात आणले जाईल असे त्यांना सांगितले पण तोपर्यंत कोलवा रेसिडेन्सी मधील केंद्र चालूच ठेवले जाईल असे स्पष्ट केले. या केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती आलेमाव यांनी दिली.
आझादनगरी परिसराचे स्क्रिनिंग
ईएसआय कॉलनी परिसरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळल्याने सोमवारी ईएसआय परिसरासह आझादनगरी व मारियाबांध या परिसरातील राहिवासीयांची तपासणी करण्यात आली. यावेळी आमदार दिगंबर कामत हेही उपस्थित होते. मंगळवारी खारेबांध, खारेला, सिने लता या परिसरात स्क्रिनिंग केले जाणार असल्याची माहिती कामत यांनी दिली.