- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: मडगावच्या कोविड (ईएसआय) इस्पितळात जे नव्याने सात पोसिटीव्ह रुग्ण दाखल केले आहेत त्या रुग्णांमध्ये एका दीड वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. सध्या या मुलीवर इस्पिटलाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पेडियाट्रीक वॉर्डमध्ये उपचार चालू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या चिमुरडीबरोबर तिच्या आईलाही तिच्या देखभालीसाठी या वॉर्डात ठेवण्यात आले असून सुदैवाने तिची आई निगेटिव्ह असल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे.
सध्या कोविड इस्पितळात ज्यांना भरती करून ठेवण्यात आले आहे त्यात या चिमुरडीशिवाय दोन महिला आणि 4 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. इतर सर्वांना तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. यापैकी 6 जण एकाच कुटुंबातील असून सातवा रुग्ण गुजरातहून ट्रक घेऊन आलेला ड्रायव्हर आहे.
गुरुवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास या सातही रुग्णांना मडगावच्या कोविड इस्पितळात आणण्यात आले. येथे आणल्यावर त्यांच्या काही चाचण्याही घेण्यात आल्या अशी माहीती मिळाली आहे. त्यापूर्वी ते फोंड्यात होते. पहाटे तीनच्या सुमारास गोमेकॉत केलेल्या चाचणीत या सर्वांचे अहवाल पोसिटीव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
मुबंईतुन गोव्याला आलेल्या त्या 6 जणांच्या कुटुंबाने आपण गोव्याचे रहिवासी असा दावा केला असला तरी ते नेमके कुठे राहत होते त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. सातवा ट्रक ड्रायव्हर बेतोडा येथे सामानाचा ट्रक घेऊन आला होता.