- सदगुरू पाटील
पणजी : सध्या देशात व जगातही कोरोनामुळे लोक धास्तावलेले आहेत. कुणीच कुठे प्रवास करू पाहत नाहीत. अशावेळी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला नव्याने उभारी मिळवून देण्यासाठी गोवा हेच आता पूर्ण सुरक्षित पर्यटन राज्य बनलेले आहे, अशा प्रकारचा प्रचार गोवा पर्यटन विकास महामंडळ यापुढे सुरू करू शकते. एकप्रकारे याची रंगीत तालिम गोव्यात सुरू झाली आहे.
अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गोव्यात मात्र तशी स्थिती नाही. गोव्यात गेल्या दि. 3 एप्रिलनंतर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. उलट जे सात रुग्ण यापूर्वी सापडले होते, त्यापैकी सहाजण उपचारानंतर ठिक झाले. सहाजण कोरोनामुक्त झाले व एकटाच सध्या उपचार घेत आहे. म्हणजे साडे पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात आता कोरोनाचा फक्त एकच पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
कोरोनाच्या सुमारे सातशे चाचण्या आतापर्यंत निगेटीव्ह निघाल्या. गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसारही झाला नाही. गोवा हे सीमा सील करणारे पहिले राज्य ठरले. अजुनही सीमा सील आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने सोमवारपासून मास्क वापरणे सुरू करावे अशी सक्ती करण्याचा निर्णयही गोवा सरकारने घेतला आहे.
गोवा हे सुरक्षित राज्य असल्यानेच आता गोव्याकडे अधिक पर्यटकांना आकर्षित करावे लागेल, असे सरकारी यंत्रणेला वाटू लागले आहे. गोव्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा प्रकारची जाहिरात सुरू करण्याचा सरकारी यंत्रणांचा विचार दिसतो. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व आमदार दयानंद सोपटे यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले की, सध्याच्या आपत्तीतही गोव्याला एक संधी आहे. ती संधी म्हणजे गोवा हेच पर्यटनासाठी सुरक्षित राज्य असल्याचा संदेश आम्हाला जगभर पोहचवावा लागेल. कोरोनाने पूर्ण जगाला घेरलेले असताना गोवा खरोखरच त्याबाबत सुरक्षित असल्यानेआम्हाला सगळीकडे तसा संदेश न्यावा लागेल. कदाचित याच सुरक्षेच्या कारणास्तव गोव्यात पूर्वीपेक्षा जास्त पर्यटक येऊ शकतील.
सोपटे म्हणाले की, हे काम सुरू करण्यासाठी व गोव्याचा पर्यटन व्यवसाय पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी आणखी काही महिने जातील. ऑक्टोबरपर्यंत आम्हाला कळ सोसावी लागेल. सध्या पर्यटनाची हानी झाली आहे. मात्र गोव्यात कोरोनाचे रुग्ण सापडत नसल्यानेतुम्ही निश्चिंतपणो गोव्यात या असे पर्यटकांना आम्ही सांगावे लागेल. तसेच ज्यावेळी विमाने सुरू होतील तेव्हा विमानतळावर प्रत्येक पर्यटकाची कोरोनाच्या दृष्टीकोनातून काटेकोरपणे वैद्यकीय तपासणी करावी लागेल. जर एखाद्या पर्यटकाबाबत संशय वाटला तर त्याला परत पाठवावे लागेल.
दरम्यान, गोवा हे कोरोनामुक्त राज्य असल्याचे जाहीर करण्याची वेळ लवकरच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकताच व्यक्त केला. गोव्याच्या शेजारील बेळगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही मात्र चिंतेची गोष्ट आहे, कारण सुमारे तीनशे ट्रक भरून बेळगावहून गोव्याला भाजी येते असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊननंतरचा काळ हा गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सर्वात खडतर व कठीण असेल, सर्वात मोठा फटका पर्यटनाला बसेल असे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोज काकुलो म्हणाले.