पणजी - राज्यात कोरोनामुळे रोज वीसहून अधिक रुग्ण मरण पावण्याची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी चोवीस तासांत २४ कोरोनाग्रस्तांचा जीव गेला. एप्रिल महिना हा किलर ठरला असून गेल्या ३० दिवसांत या महिन्यात ३३७ कोरोनाग्रस्तांचे निधन झाले. यात काही अत्यंत प्रतिष्ठीत व कलाकार व्यक्तींचाही समावेश आहे. गोव्यात गेले काही दिवस रोज तीन हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत साठहून अधिक वर्षांचे अनेकजण मरण पावले. आता पन्नासहून कमी वयाचेही मरण पावत आहेत. शुक्रवारी २२ बळींमध्ये सहाजण हे पन्नासहून कमी वयाचे आहेत. बाणावली येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाने मरण पावला. फोंड्यातील दोघा ४८ वर्षीय महिलांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. वास्कोतील ४६ वर्षीय पुरुष तसेच ओरीसा येथील ४७ वर्षीय व्यक्तीचे गोव्यात निधन झाले. गेल्या वर्षभरात कधीच एका महिन्यात ३३७ व्यक्तींचे कोविडने निधन झाले नव्हते.
एप्रिलमध्ये मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. गेल्या पंधरा दिवसांतच जास्त मृत्यू झाले. शुक्रवारी नऊ रुग्ण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर बारा रुग्ण बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात मरण पावले. धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाला मृत स्थितीतच आणले होते. डिचोली, बाळ्ळी, आके, बोट्टार साकोर्डा, अंजुणा, साळगाव, हळदोणा, पेडणे, पर्वरी अशा ठिकाणच्या रुग्णांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. तिसवाडीत दोघे, फोंड्यातील दोघे व मुरगाव तालुक्यातील तीन रुग्ण दगावले.