पणजी : राज्यात कोविडमुळे हाहाकार माजल्यासारखी स्थिती आहे. गेल्या चोवीस तासांत ३८ मृत्यू झाले आहेत. अजुनही १५० रुग्ण वेन्टीलेटरवर आहेत. सरकारने अजून लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही पण स्थिती अशीच हाताबाहेर जात राहिली तर लॉकडाऊन होईल. स्वत: आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनीही लॉकडाऊनची सूचना केली आहे.
कर्नाटक सरकारने लॉकडाऊन पुकारल्यानंतर गोव्यातही लॉकडाऊन करावा अशा प्रकारचा दबाव विरोधी पक्षांकडून येऊ लागला आहे. ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही लॉकडाऊन पुकारून सरकारने लोकांचे प्राण वाचवावे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमेकॉ इस्पितळाचे डीन व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यात ३८ मृत्यू झाल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. गोव्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही पण अशीच स्थिती राहिली तर अत्यंत कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागतील असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. विवाह सोहळ्यांमध्ये जास्त गर्दी होते. जात्रा, विवाह व अन्य सोहळे जिल्हाधिकारी व पोलिस आज मंगळवारपासून बंद करतील. जर विवाहांना गर्दी झाली असे आढळून आले तर पोलिस ते बंद करतील असे मुख्यमंत्री म्हणाले. आता राज्यात सगळीकडे खाटा व ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, डीन बांदेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकांनी कोविडची लक्षणे दिसताच लगेच चाचणी करून इस्पितळात दाखल व्हावे.अनेकजण अजुनही उशिराच इस्पितळात येतात. एकदा ते वेन्टीलेटरवर गेले की, मग त्यांना वाचविणे कठीण होते. लवकर आले इस्पितळात व मरण पावले अशी एक देखील घटना घडलेली नाही, असे बांदेकर म्हणाले.
विश्वजित म्हणतात लॉकडाऊनच करा
कर्नाटकच्या धर्तीवर गोव्यात देखील लॉकडाऊन करण्याची गरज आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊन करावे लागेल. ते केले नाही तर राज्यात दिवसाला कोविडमुळे दोनशे- तीनशे देखील मृत्यू होणे पुढील दहा दिवस सुरू राहू शकते, असा इशारा मंत्री विश्वजित राणे यांनी दिला. चेन तोडणे गरजेचे आहे. गोव्यात स्थिती खूप गंभीर आहे. लोकडाऊन करण्याची आमची विनंती मुख्यमंत्री विचारात घेतील असे मला वाटते.