पणजी - राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलिसांची उपस्थिती अनेक रस्त्यांवर व बाजारपेठांच्या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र लोक बाजारपेठा, दुकाने व अन्यत्र अनावश्यक फेऱ्या मारतानाही दिसून येत आहेत. पणजी किंवा अन्यत्र बाजारपेठांमध्ये वाहनांची मोठीशी गर्दी नाही पण अनावश्यकपणे फेऱ्या मारणाऱ्या लोकांची संख्याही कमी नाही असा अनुभव आला. सकाळी मासळी खरेदीसाठीही बरेच लोक येऊन गेले. लॉकडाऊन होणार याची कल्पना अगोदर आल्याने काही लोकांनी आपल्याला चार दिवसांसाठी हवे ते सामान अगोदरच घेऊन ठेवले. लॉकडाऊन काळात आठवड्याचा बाजार बंद असेल पण अन्य पालिका व पंचायत बाजार बंद नसतील. काही ठिकाणी व्यापारी दुपारपर्यंतच व्यवहार सुरू ठेवतील, असे सांगण्यात आले.
रस्त्यांवरून वाहने धावत आहेत. बांधकाम व्यवसाय, उद्योग, सरकारी व खासगी कार्यालये सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना कामाला जावेच लागते. मात्र पणजी, म्हापसा, वास्को, फोंडा, साखळी, डिचोली, मडगाव, कुडचडे आदी विविध भागांमध्ये अनावश्यकपणे तरूण दुचाकींवरून फिरतानाही आढळून आले. ज्यांना काहीच काम नाही असे मजुर किंवा लोक रस्त्यांच्या बाजूने बसून गप्पा मारतानाही आढळून आले. नेहमीप्रमाणे सर्वच दुकानांच्या बाहेर ग्राहक दिसून आले. विद्यालये बंद आहेत. पणजीत कसिनो बंद राहिले. कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या प्रवासी वाहतूक करत आहेत. काही रस्त्यांवर पोलिसांकडून दुचाकी व अन्य चार चाकी वाहने अडवून कुठे जातात असे लोकांना विचारण्याचे काम केले जात आहे. पणजी बाजारात काही दुकाने बंद होती पण भाटले वगैरे परिसरात सगळे व्यवहार सुरू राहिले.
राज्यात कोविड रुग्ण संख्या प्रचंड वाढल्याने व अनेकांचे बळी जात असल्याने सरकारने कडकडीत असा लॉकडाऊन पुकारावा अशी मागणीही वाढत आहे. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पुढील पंधरा दिवस गोव्यात अत्यंत कडक असा लॉकडाऊन पुकारला जावा अशी मागणी शुक्रवारी सरकारकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनीही कडक लॉकडाऊन हवा व कडक निर्बंध हवेत अशी मागणी शुक्रवारी केली. लोक मरत असताना सरकार अत्यंत फसवा असा लॉकडाऊन करत आहे. सध्याचा लॉकडाऊन हा लॉकडाऊनच नव्हे असे जुझे फिलिप म्हणाले. दरम्यान, डिचोलीत काही ठिकाणी मोठ्या संख्येने दुकाने बंद ठेवून लॉकडाऊन पाळण्यात आला. कोविडची भीती वातावरणात भरून राहिलेली आहे. अनेक व्यापारी व लोकांनीही लॉकडाऊनचे व्यवस्थित पालन केले, असे काही नागरिकांनी सांगितले.