पणजी : कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे गोवा सरकारने राज्यात चालू असलेल्या चित्रीकरणावर बडगा हाणला असला तरी दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याच्या सूचनेवरून एका प्रमुख फिल्म कंपनीने उत्तर गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या मालिकेचे चित्रीकरण सुरूच ठेवले असल्याची तक्रार अनेक लाईन प्रोड्युसरनी केली आहे.गोव्यातील चित्रीकरणावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या गोवा मनोरंजन सोसायटीने गेल्या तीन दिवसांत दोन चित्रीकरणे बंद पाडली असली तरी नेरूल येथील या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते अद्याप शिरकाव करू शकलेले नाहीत. ‘राज्यातील लाईन प्रोड्युसरने केलेल्या तक्रारीवरून आम्ही उत्तर गोव्यातील तीन ठिकाणचे चित्रीकरण बंद केले आहे. तरीही एका पंचतारांकित हॉटेलात चित्रीकरण सुरू असल्याची तक्रार आमच्याकडे पोहोचली आहे आणि आमचे पथक एका दिवसात तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे’, अशी माहिती ईएसजीच्या जनरल मॅनेजर मृणाल वाळके यांनी शनिवारी ‘लोकमत’ला दिली.गोव्यातील काही लाईन प्रोड्युसरनी आपले नाव सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, बालाजी फिल्मस्च्या दोन मालिकांचे चित्रीकरण उत्तर गोव्यातील हिल्टन हॉटेलमध्ये सुरू आहे. दिल्लीतील एका वजनदार मंत्र्याच्या पाठिंब्यामुळे राज्य सरकारही या चित्रीकरणाला आडकाठी आणू शकलेले नाही. याबाबत हिल्टनचे संचालक सूरज मोरजकर यांना विचारले असता, संपूर्ण हिल्टन हॉटेलच एका चित्रपट निर्मात्या संस्थेने भाड्याने घेतल्याचे त्यांनी कबूल केले. एकाच कंपनीला हॉटेल दिल्यामुळे बाहेरचे कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही आणि ही मंडळी नियमानुसार हॉटेलमध्येच मुक्काम ठोकून आहेत.दुसऱ्या एका लाईन प्रोड्युसरच्या मते, चित्रपट निर्मात्यांनी कनिष्ठ कलाकारांचा पुरवठा करणाऱ्या दक्षिण गोव्यातील एका व्यक्तीकडून असंख्य ज्युनिअर आर्टिस्ट मिळवणे सुरू केले आहे. त्यामुळे शेकडो असे कलाकार चित्रीकरणासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे कोविड पसरण्याचा धोका आहे. पंचतारांकित हॉटेलने मात्र कोणालाही आतमध्ये येऊ दिले जात नाही, असे ठासून सांगितले. गोव्यातील लाईन प्रोड्युसर संघटनेने गोवा मनोरंजन सोसायटीकडे रितसर नोंदवलेल्या तक्रारीत गोव्यात चार ठिकाणी बेकायदेशीर चित्रीकरण चालू असल्याचे म्हटले होते. मांद्रे येथील रिवा, नेरूलचा सोल व्हिला आणि लोटली येथील एका घरात हे चित्रीकरण सुरू होते.मृणाल वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईएसजीने वरील चारही ठिकाणी त्वरित कारवाई केली. परंतु आम्ही तेथे येत असल्याचा सुगावा लागल्यामुळे काहीजणांनी चित्रीकरण आटोपून तेथून पळ काढला होता. वास्तविक बेकायदेशीररित्या चित्रीकरण चालू असल्यास तेथील सर्व साहित्य जप्त करण्याचा अधिकार ईएसजीला आहे. गोव्यातील लाईन प्रोड्युसर बेकायदेशीररित्या चित्रीकरणांना पाठिंबा देत असतील तर त्यांची नोंदणी रद्द करण्याचेही पाऊल ईएसजी उचलू शकते आणि तसा इशारा आम्ही यापूर्वीच दिला आहे. परंतु सध्या चित्रीकरण चालू असलेल्या कुठल्याही ठिकाणी गोव्यातील लाईन प्रोड्युसर गुंतलेला नाही, अशी माहिती आमच्याकडे आहे.
नेत्यांच्या पाठिंब्याने राज्यातच मुक्काम मुंबईमध्ये चित्रीकरण बंद पडल्यानंतर बरेच मालिका निर्मात्यांनी गोव्याकडे मोर्चा वळविला होता. त्यातील मराठी मालिकांनी आपला गाशा गुंडाळला असला तरी काही बलाढ्य कंपन्या नेत्यांच्या पाठिंब्याने राज्यातच मुक्काम ठोकून असल्याची माहिती प्राप्त झाली.